भिवंडीत विचित्र चोरीने खळबळ 50 महागड्या ब्लाउससह 1.20 लाखांचा ऐवज लंपास
चोरीचे अनेक प्रकार पाहिले असतील. चोर अनेकदा पैशांवर किंवा दागिन्यांवर डल्ला मारतात. परंतु भिवंडीत एका चोरट्याने चक्क १ लाख २० हजार रुपये किमतीचे ५० शिवलेले ब्लाऊज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहा महिने टेलरच्या दुकानात काम करुन चोरट्याने हा डाव साधला. या घटनेनंतर आता मालकाला महिलांचे महागडे ब्लाऊज कसे देणार असा प्रश्न पडला आहे.
भिवंडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार हे शिवणकाम व्यवसायिक आहेत. त्यांचे भिवंडी येथील पारनाका परिसरात महिलांचे वस्त्र शिवण्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात दोन व्यक्ती कामाला आहेत. यातील एकजण सहा महिन्यांपूर्वीच काम करत होता. त्याचे कुटुंब नसल्याने तक्रारदार यांनी त्याला अत्यंत विश्वासाने दुकानाची किल्ली दिली होती. या दुकानात तो कामगार रात्री झोपत असे. परंतु याच विश्वासाचा त्या कामगाराने गैरफायदा घेतला.७ एप्रिलला रात्री ११ वाजताच्या सुमारास तक्रारदार आणि त्यांचा कर्मचारी दुकानातून निघून गेल्यावर त्या कामगाराने आतून दुकान बंद केले. ८ एप्रिलला सकाळी ९ वाजता दुसरा कामगार दुकानाजवळ आला. परंतु दुकानामध्ये झोपणारा तो कामगार दुकान उघडत नव्हता. त्यामुळे त्याने त्याला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याने काॅलला देखील प्रतिसाद दिला नव्हता. त्याने तात्काळ याबाबतची माहिती मालकाला दिली. दुकान मालक दुकानाजवळ पोहचल्यानंतर त्यांनी दुकान उघडले. त्यावेळी दुकानात हँगरला लटकविलेले ५० ब्लाऊज गायब होते. तसेच दुकानात ठेवलेली ४८ हजार रुपयांची रोकड देखील चोरीला गेली होती. त्यांचा दुकानासाठी वापरला जाणारा मोबाईल फोन देखील आढळून आला नाही.
तक्रारदार यांनी त्या कामगाराला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मोबाईल बंद होता. अखेर ही चोरी त्याच कामगाराने केल्याच्या संशयातून मालकाने याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.