द.ग. तटकरे महाविद्यालय तळा जि. रायगड या महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी.
सोशल मीडियाच्या विषमतावादी विळख्यातून सुटका होण्यासाठी महात्मा फुलेंचे विचारच प्रभावी: प्रा. मानसी अहिरेसमकालीन सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर लिंगभेद, जातीभेद, धर्मभेद आणि उच्च-निच भाव जोपासला व प्रसारित केला जात आहे. सोशल मीडियाच्या या विषमतावादी विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी दिलेला विवेकी विचारांचा वारसा हेच आजच्या काळातील सर्वात प्रभावी उत्तर आहे, असे प्रतिपादन प्रमुख व्याख्यात्या प्रा. मानसी अहिरे यांनी केले. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे, डी. जी. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा आणि वीर वाजेकर महाविद्यालय, फुंडे (नवी मुंबई) यांच्या राज्यशास्त्र विभाग व आयक्यूएसी (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त 'सोशल मीडिया: प्रश्न तुमचे, उत्तर जोतीरावांचे' या विषयावर विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी पुढे बोलताना प्रा. मानसी अहिरे यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आपण स्वतःच्या मन आणि मेंदूला विकसित करणे गरजेचे आहे. स्वसंशोधन आणि विचारांच्या प्रगल्भतेच्या जोरावरच आपण या वाढत्या विळख्यातून स्वतःचा बचाव करू शकतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम मुळे होते. त्यांनी महात्मा फुले यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करताना, भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' ही पदवी बहाल करावी, अशी आग्रही भूमिका मांडली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नानासाहेब यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या जीवनात महात्मा फुले यांच्या विचारांची असलेली महती विशद केली. महात्मा फुले यांच्या विचारांमुळेच समाजात समता आणि शिक्षणाची दारे खुली झाली, हा वारसा विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा असे त्यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप घोडके यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे समकालीन अन्वयार्थ स्पष्ट करून कार्यक्रमाचे औचित्य मांडले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. भगवान लोखंडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. भरत चाळके यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी मानले. या व्याख्यानासाठी दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. भगवान लोखंडे IQAC कॉर्डिनेटर डॉ.तृप्ती थोरात सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.