महाराष्ट्र पोलीसांना हेल्मेट सक्ती; नियमभंगावर दंड व सेवापुस्तकात नोंद!.... मा. पोलीस महासंचालक यांचे आदेश
कोल्हापूर : ११ ( प्रतिनिधी )
राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. मा. पोलीस महासंचालकांनी ३ एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथे घेतलेल्या बैठकीत याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून सर्व आयुक्तालये व जिल्ह्यांना तातडीने परिपत्रक काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या दहा वर्षांतील अपघातांच्या आकडेवारीनुसार, मृत्यू किंवा गंभीर जखमी झालेल्यांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के प्रकरणे दुचाकीस्वारांची आहेत. हेल्मेट वापरल्यास प्राणांतिक अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे निरीक्षण समोर आले आहे. मात्र मुंबई व नागपूर वगळता राज्यातील इतर शहरे व जिल्ह्यांत हेल्मेट वापराबाबतची अंमलबजावणी समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे.
रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबई व नागपूर येथे ८० टक्क्यांहून अधिक दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात, तर इतर ठिकाणी हे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी स्वतःच हेल्मेट वापरत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा कलम १९४ डी नुसार हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच, हेल्मेट न घातलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर आढळल्यास संबंधितांवर दंड वसूल करण्याबरोबरच सेवापुस्तकात नोंद घेण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस दलाने स्वतःपासून आदर्श घालून देणे आवश्यक असल्याचे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.