डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला ! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके
भारतीय डाक विभागाच्या रेल्वे डाक सेवा 'ब' मंडळ, पुणे येथील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी करत विभागाचा मान उंचावला आहे. अखिल भारतीय नागरी सेवा वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि खो-खो स्पर्धांमध्ये पुण्याच्या खेळाडूंनी चमकदार यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वेटलिफ्टिंग स्पर्धेत तृप्ती माने (एम.टी.एस., आर.एम.एस. 'ब' मंडळ, पुणे) यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्यांनी स्नॅच प्रकारात 55 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 75 किलो असे एकूण 130 किलो वजन उचलत प्रतिस्पर्थ्यांना मागे टाकले. त्यांच्या या ताकदवान आणि तांत्रिक खेळीने उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली.
खो-खो स्पर्धेत विक्रम पाटील (सॉर्टिंग असिस्टंट, आर.एम.एस. 'ब' मंडळ, पुणे) यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक मिळवले. त्यांच्या चपळाई, वेग आणि संघभावनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पुण्याच्या या यशस्वी खेळाडूंमुळे भारतीय डाक विभागाचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
दरम्यान, या यशामागे खेळाडूंची जिद्द, कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे अधोरेखित झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आर.एम.एस. 'ब' विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.