लोणी गवळी हादरलं! जि.प. शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर अश्लील चाळे”
डोणगाव प्रतिनिधी : सालार बेग
डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या तीन चिमुकल्या विद्यार्थिनींशी एका शिक्षकाने असभ्य वर्तन केल्याची संतापजनक घटना बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, तो लवकरच सेवानिवृत्त होणार होता. मात्र, त्याने विद्यार्थिनींसोबत केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे त्याचे कृत्य उघड झाल्यानंतर त्याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने मागील काही काळापासून आपल्या वर्गातील मुलींशी अश्लील चाळे केले होते. या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जीव मारण्याची धमकी देत असल्याने मुली भयभीत होत्या. दरम्यान, ८ एप्रिल रोजी त्याने तीन विद्यार्थिनींशी पुन्हा असभ्य वर्तन केल्याचे समोर आले. त्यानंतर मुलींनी ही बाब आपल्या पालकांना सांगितली.
घटनेची माहिती मिळताच संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत आरोपी शिक्षकाला चांगलाच चोप दिला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत पोलीस पथक व राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले. यावेळी गावात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर अशा प्रकारचे कृत्य झाल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.