कुर्ला प्रभाग 165 मध्ये अनधिकृत बांधकामाचा धुमाकूळ; मनपा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
मुंबईतील कुर्ला परिसरातील प्रभाग क्रमांक 165 मध्ये अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, यामध्ये मनपा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कप्तान बेकरी, बिलाल मस्जिद समोर, गुडलक डेरी जवळ, हलाल पुल परिसरात अंदाजे 2000 स्क्वेअर फुटांवर G+2 स्वरूपाचे मोठे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बांधकामावर कारवाई करण्यास मनपा एल विभाग टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे, जे.ई. अशोक तसतोडे यांनी “दोन दलालांना हे बांधकाम मॅनेज करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यामुळे कोणतीही कारवाई होणार नाही,” असे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ठेकेदाराने देखील उघडपणे दावा केला आहे की, “मनपा एल विभाग माझ्या खिशात आहे, माझ्या बांधकामावर कोणतीही कारवाई होणार नाही.” तसेच त्याने काही मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचे सांगत, अधिकाऱ्यांना धमकावल्याचेही समोर आले आहे. “कोणताही अधिकारी कारवाई करेल, तर त्याची बदली करून टाकेन,” असेही तो म्हणत असल्याचा आरोप आहे.
या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासन करण्याची मागणी होत आहे. तसेच, या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.
आता प्रश्न असा निर्माण होतो की, मनपा प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देणार का? आणि दोषींवर कडक कारवाई होणार का? की हे अनधिकृत बांधकाम असेच सुरू राहणार? 🚧