logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सावधान! पाथर्डीत 'नवरी' नटली अन् दागिने घेऊन पळाली; लग्नानंतर काही तासांतच वराला दिला ठेंगा

पाथर्डी : तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, लग्न ठरवण्यासाठी एजंटला लाखो रुपये देऊनही वराची मोठी फसवणूक झाली आहे. सुसरे (ता. पाथर्डी) येथे लग्नानंतर अवघ्या काही तासांतच नवरीने घरातील मौल्यवान दागिने आणि रोकड घेऊन पलायन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुसरे येथील एका तरुणाचे लग्न जमत नसल्याने काही मध्यस्थ आणि एजंटमार्फत मुलीचे स्थळ सुचवण्यात आले होते. यासाठी मुलाकडच्यांकडून एजंटला मोठी रक्कम देण्यात आली होती. सर्व विधी पार पडल्यानंतर मोठ्या उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला. नवरी घरात आली, घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही.
लग्नानंतरचे पहिलेच दिवस असल्याने घरातील सर्वजण थकलेले होते. याचाच फायदा घेत, मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा या 'नवरी'ने घरातील कपाटात ठेवलेले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आणि कोणालाही थांगपत्ता लागू न देता घरातून पळ काढला.
सकाळी जेव्हा घरातील लोक जागे झाले, तेव्हा नवरी घरात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोधाशोध केली असता कपाटाचे कुलूप तुटलेले दिसले आणि दागिने गायब असल्याचे समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वधूपक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्फळ ठरला.
"एजंटमार्फत लग्न लावताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. सध्या अशी 'लुटेरी दुल्हन' गँग सक्रिय असून ग्रामीण भागात तरुणांना टार्गेट केले जात आहे."
याप्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली असून, संबंधित एजंट आणि फरार नवरीचा शोध सुरू आहे. अशा प्रकारे पैसे देऊन लग्न करणाऱ्या तरुणांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

41
1653 views

Comment