logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खळबळजनक: रिसोडमध्ये 'एस.आय.आर.' मॅपिंग करणाऱ्या बीएलओला बेदम मारहाण

रिसोड : शहरात शासकीय कर्तव्य बजावत असताना एका बीएलओ (BLO) कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे महसूल विभाग आणि बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ पांडुरंग बोंडे (वय ४३) हे रिसोड शहरात निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार एस.आय.आर. (S.I.R.) मॅपिंगचे काम करत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते आपले कर्तव्य बजावत असताना, अज्ञात इसमाने त्यांना अडवून अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात बोंडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमीवर उपचार सुरू
घटनेनंतर जखमी नवनाथ बोंडे यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे सावट
शासकीय कामावर असताना अशा प्रकारे भरदिवसा हल्ला झाल्यामुळे अन्य बीएलओ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेचा निषेध करत, एस.आय.आर. मॅपिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

"आम्ही शासनाचे काम करत असताना सुरक्षित नसू, तर काम कसे करायचे? संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि सर्व बीएलओ कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू असून, हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.

76
2290 views

Comment