logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

०९ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण ०३ एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह ०६ सदस्यांचा समावेश एके-४७ व कार्बाईनसह आत्मसमर्पण

गडचिरोली, (जिमाका) दि. ३१ मार्च : गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, ०३ एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह एकूण ०९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) समोर आज आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पित माओवाद्यांमध्ये दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको, रामजी अडमा पोटाम, शांती वंजा वड्डे (एसीएम), तसेच मनकु मासो पोडाम, सरिता रामा वेलकम, लखमी आयतु कुंजाम, नंदे जोगा मडे, राकेश कोरके मज्जी व सुक्की बामी कुंजाम यांचा समावेश आहे. यापैकी शांती वंजा वड्डे हिने एके-४७ रायफल व ३० जिवंत काडतुसे, तर सुक्की बामी कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कुमनार जंगल परिसरातून एके-४७ रायफल, ०३ मॅगझीन, ५७ जिवंत काडतुसे, ०३ वॉकीटॉकी, ०४ बॅटऱ्या, २० पेनड्राईव्ह असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसेच गुंडापुरी जंगल परिसरातून ७.६२ एसएलआर रायफल ०२ नग, सिंगल शॉट ०१ नग, ५० डेटोनेटरसह इतर साहित्य हस्तगत करण्यात आले.

गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे माओवाद्यांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात आळा बसला असून, सन २०२५ पासून आतापर्यंत एकूण १३२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सन २०२२ पासून आतापर्यंत १६६ जहाल माओवादी आत्मसमर्पित झाले असून, एकूण आकडा ८०५ पर्यंत पोहोचला आहे.

जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून, पूर्वी १० उपविभागांत सक्रिय असलेली ही चळवळ सध्या भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिल्याचे स्पष्ट होत आहे. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणामुळे तसेच पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे अनेक माओवादी मुख्य प्रवाहात येत आहेत.

विशेष म्हणजे, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू याच्यासह ६१ माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरात ९४० माओवादी सदस्यांनी ५६९ शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याची नोंद आहे.

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी सुमारे ४.५ ते ५.५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, गटाने आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त ४ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

या आत्मसमर्पण कार्यक्रमास सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक (अभियान)श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, कमांडंट श्री. परविंदर सिंग, तसेच पोलीस व सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

47
2804 views

Comment