पाथर्डी तालुक्यात निसर्गाचा कोप: वीज कोसळून मालेवाडीतील शेतकऱ्याचा मृत्यू; पाळीव प्राण्यांनाही बसला फटका
पाथर्डी (अहिल्यानगर): पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना अचानक कोसळलेल्या विजेमुळे शिवाजी रघुनाथ खेडकर (वय ५४) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्या इमानी पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी शिवाजी खेडकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान कडकडाटासह वीज थेट खेडकर यांच्या अंगावर कोसळली. या आघातात खेडकर आणि त्यांच्यासोबत असलेला पाळीव कुत्रा या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
संध्याकाळच्या वेळी शेतातील जनावरे आपोआप घरी परतली, मात्र बराच वेळ झाला तरी शिवाजी खेडकर घरी न आल्याने कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नातेवाईकांनी तातडीने शेतात धाव घेऊन पाहणी केली असता, खेडकर यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच आमदार मोनिका राजळे यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी महसूल आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून पंचनामा करण्याचे आदेश दिले असून, पीडित कुटुंबाला लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
पाथर्डी तालुक्याला लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील टेंभुर्णी (ता. पाटोदा) गावातही विजेचा कडकडाट पाहायला मिळाला. येथे वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.