पिंपळनेर–साक्री परिसरात गारपीट व मुसळधार पावसाचा तडाखा; कांदा, गहू पिकांचे मोठे नुकसान
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर व साक्री परिसरात अवकाळी गारपीट आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे कांदा, गहू तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 2 :30 वा. जोरदार वाऱ्यासह गारांचा मारा झाला. शेतात उभा असलेला कांदा पूर्णपणे आडवा पडला असून अनेक ठिकाणी गव्हाचे पीकही जमीनदोस्त झाले आहे. काही भागांत पाण्याचे साचलेले तळे दिसून येत असून त्यामुळे पिकांचे कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली होती, त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे.
स्थानिक प्रशासनाने पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच, कृषी विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीचे उपाय तत्काळ राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
👉 शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय लवकर जाहीर होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यशवंत शिंदे