शेतरस्ता अडवाल तर होणार आधार ब्लॉक !
AIMA News.
शेतरस्ते अडवणाऱ्यांवर सरकारचा मोठा निर्णय, आधार ब्लॉक होणार तसेच सरकारी योजना लाभांवर 5 वर्षांची बंदी.
राज्यातील शेतरस्ता अडवणाऱ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये एखाद्या शेतकऱ्यांना रस्ता अडवला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात सरकारने 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' अधिक प्रभावी करण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी केला आहे.
या नव्या निर्णयानुसार, शेतरस्ते अडवणारे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ दंडच नाही तर पुढील 5 वर्षांसाठी सर्व शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. इतकेच नाही तर संबंधित व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी देखील 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे.
गाव नकाशातील किंवा सरकारी जागेवरील रस्त्यांवर अतिक्रमण आढळल्यास तहसीलदारांकडून संबंधितांना 7 दिवसांची नोटीस दिली जाईल. या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास प्रशासन स्वतः कारवाई करून ते हटवेल.