logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

​सावधान! पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध लागू

बुलढाणा | शुक्रवार, २७ मार्च २०२६

​सावधान! पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्बंध लागू
सादिक शाह प्रतिनिधी

​बुलढाणा: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा वारंवार पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभरातील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे व कडक आदेश निर्गमित केले आहेत.

​बाटलीत किंवा कॅनमध्ये पेट्रोल दिल्यास होणार फौजदारी कारवाई!
​जिल्हा पुरवठा विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, आता कोणत्याही पेट्रोल पंपावर प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा इतर अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच वितरित करावे, असे स्पष्ट निर्देश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले आहेत. ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

​पेट्रोल पंपांसाठी नवे नियम:
​अत्यावश्यक सेवांना प्राधान्य: रुग्णवाहिका (Ambulance) आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना इंधन पुरवठ्यासाठी प्राधान्य देणे बंधनकारक आहे.
​साठ्याची माहिती फलकावर लावा: प्रत्येक पंपावर शिल्लक असलेला साठा, प्राप्त झालेला साठा आणि मागणीची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे अनिवार्य आहे.
​सीसीटीव्ही वॉच: सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवावी लागेल आणि विक्रीच्या नोंदी नियमित अद्ययावत ठेवाव्या लागतील.
​जागरूकता फलक: "अनावश्यक साठा करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका" अशा आशयाचे फलक पंपावर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
​प्रशासनाचा कडक इशारा

​जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, पेट्रोल पंप चालक किंवा संस्थांविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार कडक दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

32
3008 views

Comment