नाशिक जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या अफवेने पंपांवर वाहनांच्या रांगा
नाशिक जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या अफवेने पंपांवर वाहनांच्या रांगा; वितरकांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे!
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या अफवेने पंपांवर वाहनांच्या रांगा
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विशेषत: नाशिक शहराच्या विविध भागांतील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. तसेच या संदर्भात हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात,अशी विनंती या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
अमेरिका-इस्राइल व इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांतून पसरत असलेल्या चुकीच्या माहितीमुळे वाहनधारक इंधन साठा करण्यासाठी पंपांवर गर्दी करत आहेत. या ‘पॅनिक बायिंग’ तथा घाबरलेल्या अवस्थेत होणाऱ्या खरेदीमुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण रांगा होत असल्याचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्यामुळे ज्यांना खरोखरच इंधनाची निकड आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ही परिस्थिती वेळीच आटोक्यात आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या स्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,अशी भीतीदेखील यावेळी वर्तवण्यात आली.
पुरवठा साखळीत तांत्रिक अडचणी
अनावश्यक इंधन खरेदीमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागणे, ही एक डोकेदुखी आहेच पण,त्याचबरोबर ऑइल कंपन्यांकडून होणाऱ्या पुरवठ्यात जे अडथळे येत आहेत,त्यावरही पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोट ठेवले. सप्लाय डेपोकडून वेळेवर माल उपलब्ध होत नाही. पेट्रोल पंप चालकांनी ऑइल कंपन्यांकडे आगाऊ पैसे जमा करूनही टँकरचे लोडिंग वेळेत मिळत नाही. त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होत असून पंपांवरील साठा संपुष्टात येण्याची समस्या उद्भवत असते,ही बाब पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली