फळपीक विमा घोटाळा,
रावेर : रावेर तालुक्यातील केळी फळपीक विमा योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रचालकांवर केवळ ४.७४ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु उर्वरित मोठी रक्कम आणि त्यामागील साखळी पडद्याआड असल्याने, कारवाईबद्दल अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत.
रावेर तालुक्यातील २९ हजार ८२ शेतकऱ्यांनी संरक्षित विम्यासाठी २८ हजार १४७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. मात्र, उपग्रह सर्वेक्षणात यापैकी ३२.७९ टक्के म्हणजेच ९ हजार २२९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात केळी लागवडच नसल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रतिहेक्टरी ५७
हजार ८०० रुपयांचा विचार करता कोट्यवधींची फसवणूक झाल्याचेसमोर आले आहे. नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राच्या अहवालानुसार काही सेवा सुविधा केंद्रांमधून संशयास्पद पद्धतीने मोठ्या प्रमाणावर विमा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही समोर आले होते. यापैकी १०० पेक्षा अधिक प्रकरणे तयार करून सुमारे ८२१ हेक्टर क्षेत्रासाठी शासनाची ४.७४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार सुविधा केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित ८ हजार ४०८ हेक्टर क्षेत्रावर लागवड नसतानाही विमा घेतल्याचे समोर आले आहे.