चांभार्डा येथे जखमी बिबटाचा मृत्यू; तिघा गावकऱ्यांवर हल्ला, वाघाशी झुंजीचा अंदाज
पोर्ला वनपरिक्षेत्रातील चांभार्डा येथे बुधवारी सकाळी मोठा प्रकार घडला. चांभार्डा ते मरेगाव पांदन रस्त्यालगत हरिदास रामजी मुनघाटे (रा. चांभार्डा) यांच्या शेताजवळ एक बिबट जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या गावकऱ्यांवर बिबटाने हल्ला केल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं.
या हल्ल्यात विलास दादाजी ठाकरे (वय 48, रा. चांभार्डा), रेखा खुशाल मडावी (वय 45, रा. चांभार्डा) आणि लुभाजी देवराव मुनघाटे (वय 40, रा. चांभार्डा) हे तिघे जखमी झाले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. पाचभाई (वनपरिक्षेत्र अधिकारी, पोर्ला) यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
गावकऱ्यांची गर्दी वाढू नये म्हणून लोकांना लगेच दूर करण्यात आले. जखमींना प्रथम प्राथमिक उपकेंद्र, चांभार्डा येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलवण्यात आले.
दरम्यान, आरआरटी गडचिरोली पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी बिबटाची जवळून पाहणी केली असता कोणतीही हालचाल दिसली नाही. स्नेअरपोलच्या मदतीने हलवून पाहिले असता बिबट मृत झाल्याचे स्पष्ट झाले. झुडपातून बाहेर काढून नीट पाहणी केली असता मानेजवळ आणि अंगावर दात व नखांचे खोल जखमा दिसून आल्या.
या जखमांवरून हा बिबट दुसऱ्या एखाद्या मोठ्या वन्यप्राण्याशी, बहुधा वाघाशी झालेल्या झुंजीत जखमी होऊन मृत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
मौक्यावर आर. एस. सूर्यवंशी (सहाय्यक वनसंरक्षक, वडसा वनविभाग), आर. डी. पाचभाई (वनपरिक्षेत्र अधिकारी, पोर्ला), के. व्ही. गवते (पोलीस निरीक्षक, आरमोरी), पोलीस स्टेशन आरमोरीचे कर्मचारी, डॉ. मृणाल टोंगे (पशुवैद्यकीय अधिकारी, RRT गडचिरोली), तसेच आरआरटी पथक व वन कर्मचारी उपस्थित होते. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर बिबटाचे शव पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले असून पुढील शवविच्छेदनाची कार्यवाही सुरू आहे.