logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कडक उन्ह्याळ्यात वाढत्या तापमानात आरोग्य सांभाळा .

*उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात “आरोग्य” सांभाळा...!*

सध्या वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मार्च महिन्यापासुनच आपण राज्यातील अनेक भागात तापमान वाढताना पाहत आहोत. सर्व साधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात तापमान ४५ अंश सेल्शियस पेक्षा जास्त असेल तर त्याभागात उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे सन बर्न, हिट क्रॅम्प्स (उष्णतेमुळे स्नायुंना गोळे येणे), हिट एग्जोर्शन (उष्णतेमुळे प्रचंड थकवा), हिट स्ट्रोक (उष्माघात) यांसारखे प्रामुख्याने उष्णताविकार असून साधारण एप्रिल, मे या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो.
*उष्माघातासाठी अती जोखमीचे घटक*

 उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक
 वृद्ध व्यक्ती व लहान मुले
 गरोदर महिला
 स्थूल व्यक्ती व पुरेशी झोप न झालेले व्यक्ती
 मधुमेह, हदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक
 घट्ट कपडे घातलेले लोक, निराश्रीत, घरदार नसलेले गरीब लोक
 कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे लोक
अशा अति जोखमीच्या लोकांना उष्माघाताचा धोका असून विशेषतः त्यांनी उष्णतेच्या लाटेदरम्यान विशेष काळजी घेतली पाहीजे. उष्णतेमुळे होणारा शारीरिक त्रास किरकोळ स्वरूपाच्या किंवा गंभीर स्वरूपाचा असतो.

 *लक्षणे-*
 *किरकोळ त्रासात* उष्णतेमुळे थकवा येणे, ताप येणे, शरीरावर रॉश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात.
*गंभीर त्रासात* उष्माघात होऊन त्वचा गरम व कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, नाडीचे ठोके वेगात व जोऱ्यात असणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुध्द अवस्था अशा लक्षणासह मृत्यूही होऊ शकतो.

 *प्रतिबंधात्मक उपाय*
*हे करा-* पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे (पांढरे) सैलसर कपडे वापर. उन्हात चष्मा, छत्री, टोपी व पादत्राणे वापर. ओलसर पडदे (वाळ्याचे), पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. शक्य असल्यास उन्हात जाण्यापुर्वी सनस्क्रिन क्रिम वापरा किंवा कोरफडीचा गर लावा. शरबत किंवा जलसंजीवनीचा वापर करा.
*हे करू नये-* कष्टाची कामे उन्हात करू नका. शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाने टाळा. लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नका. गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका. मद्यपान, चहा, कॉफी, सॉफटड्रीक टाळा. खुप प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. उन्हाच्या काळात भर दुपारी स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.
 *प्रथोमचार-* रुग्णास वातानुकुलीत खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे कुलर ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आईसप्याक लावावेत. रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे.

*आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन*
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व इतर शासकीय दवाखान्यात उन्हाळाच्या पूर्वतयारी अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत उष्माघात कक्ष स्थापना, मुबलक औषधी साठा उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण, आरोग्य शिक्षण, जनजागृती इत्यादी उपाययोजना करण्यात आलेल्या असून ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवण्यात आलेली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी दिवसांमध्ये जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवू शकते, अशा परिस्थितीत विविध उष्णताविकार अथवा उष्माघात होऊ नये यासांठी नागरिकांनी आता पासूनच सजग रहावे व प्रतिबंधात्मक उपायावर अधिक भर द्यावा. तसेच उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुलकुमार मीना, आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ सुनील भागवत यांनी केले आहे.

8
1229 views

Comment