मध्यप्रदेशातून आणलेल्या 2 लाखांच्या 4 पिस्तुलांसह आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई
कोल्हापूर (तुषार पोवार) : शहापूर पोलिस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून आणलेल्या सुमारे २ लाख रुपये किंमतीच्या ४ देशी बनावटीच्या पिस्तुलांसह एकाला अटक केली आहे.
शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 75/2026 अन्वये आर्म्स ॲक्ट 1959 चे कलम 3, 25 तसेच मादक द्रव्य व मनोप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी मनीष रामविलास नागोरी (वय 36, रा. प्रियदर्शिनी हौसिंग सोसायटी, यड्राव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पिस्तुले मध्यप्रदेश येथील सरनाम नाहरसिंह बरनाला व वर्ष 28 रा.सिंगनूर पोस्ट ता.गोगावा जि.खरगुण रा.मध्यप्रदेश नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे समोर आले.
यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक रोप मोरे व पथक मध्यप्रदेश येथे तपासासाठी रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सरनामची माहिती मिळाली. त्याचे पूर्ण नाव सरनाम नाहरसिंह बरनाल, रा. सिंगनूर पोस्ट, ता. गोगावा, जि. खरगोन, मध्यप्रदेश असे आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सरनाम हा हत्यार विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पथकाने मध्यप्रदेशातील बुरहानपूर रेल्वे स्टेशनजवळील सम्राट हॉटेल परिसरात सापळा रचला. 15 मार्च 2026 रोजी सायंकाळी तो मोटारसायकलवरून तेथे आला असता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने जवळील पांढऱ्या रंगाची पिशवी टाकून मोटारसायकलवरून पळ काढला.
पोलिसांनी पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये सुमारे 2 लाख रुपये किंमतीची 4 देशी बनावटीची पिस्तुले आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली.
यानंतर पोलिसांनी पुन्हा शोधमोहीम राबवून सरनाम नाहरसिंह बरनाल (वय 28) याला 20 मार्च 2026 रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 24 मार्च 2026 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक रोप मोरे व त्यांच्या पथकाने केली.