गॅस टंचाईमुळे इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक; कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल
गॅस टंचाईमुळे ऑनलाईन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करताना कोथ
गॅस टंचाईमुळे इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक; कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल
गॅस टंचाईमुळे ऑनलाईन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करताना कोथरूडमधील एका ज्येष्ठाची ३.१० लाखांची फसवणूक झाली. तर चंदननगरमध्ये 'ऑनलाईन टास्क'च्या बहाण्याने महिलेला ३.१९ लाखांचा गंडा घातला आहे.
Written aima midiya jan jan ki avaj
पुणे
Updated:
March 21, 2026 11:05पुणे : गॅस टंचाईची झळ सामान्यांना बसली आहे. गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तीन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांनी समाज माध्यमात इलेक्ट्रीक शेगडीची जाहिरात पाहिली होती. गॅस टंचाईमुळे त्यांनी शेगडी खरेदी करण्याचे निश्चित केले. त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी शेगडी खरेदीचे पैसे ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागतील, असे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली.
या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तीन लाख दहा हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत. गॅस टंचाईमुळे चोरट्यांकडून नागरिकांना इलेक्ट्रीक शेगडी, तसेच सिलिंडर देण्याचे आमिष दाखविले जात आहे. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे. गॅस वितरण करणाऱ्या कंपनीच्या नावे फसवणूक करणारे संदेश चोरट्यांकडून पाठविले जातात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा
कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत – घरात शिरून तोडफोड करणारे अटकेत
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक
घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी चंदननगर भागातील एका महिलेची तीन लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता.
ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील. एका तारांकित हाॅटेलला दर्शक पसंती (रिव्ह्यूज) मिळवून द्यायचे आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या खात्यात परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. पैसे गुंतविल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही दिली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत.