logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे भीषण आग; किराणा दुकानासहित घर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान

लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे भीषण आग; किराणा दुकानासहित घर जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान
(लोणार): तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे शनिवारी दुपारी ३ ते ३:३० च्या सुमारास लागलेल्या एका भीषण आगीत विठ्ठल लोभाजी कुट्टे यांचे किराणा दुकान आणि राहते घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत त्यांचे सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, काही वेळातच विठ्ठल कुट्टे यांचे संपूर्ण दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. दुकानातील फ्रिज, किराणा सामान, कटलरी आणि कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दुकानासोबतच घरामध्ये साठवलेला शेतमाल आणि काही रोख रक्कम देखील जळाली असल्याने कुट्टे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले
आगीची बातमी समजताच गावातील तरुण आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले होते, मात्र तोपर्यंत आगीने मोठे रूप धारण केले होते. गावकऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि जवळपास ८०% आग विझवली. त्यानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीने आग पूर्णपणे शांत केली.
लोकप्रतिनिधींनी दिली भेट
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी दिपक कायंदे, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदूभाऊ मापारी, ॲड. शिवराज सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आमदार आणि खासदारांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेत तहसीलदारांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

30
2195 views

Comment