logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

"चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा” जनता विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा


पिंपळगाव सराई, बुलढाणा महाराष्ट्र,
दि. २० मार्च २०२६ :

उपक्रमशीलतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे इको क्लबच्या वतीने जागतिक चिमणी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक संजय पिवटे उपस्थित होते, तर ज्येष्ठ शिक्षक रवींद्र खानंदे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या निमित्ताने विद्यार्थ्यांनी “टाकाऊ पासून टिकाऊ” या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवत टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक व उपयुक्त अशी चिमण्यांची घरटी तयार केली. विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपल्या घरी व परिसरात अशा घरट्यांची उभारणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमादरम्यान “पक्षांना दाणापाणी” हा उपक्रमही राबवण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी प्रेम, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शक रवींद्र खानंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, चिमण्या या पर्यावरणाच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा असून त्यांचे अस्तित्व टिकवणे अत्यावश्यक आहे. वाढते प्रदूषण, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि घरट्यांसाठी जागेचा अभाव यामुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे प्रत्येकाने छोट्या कृतीतून चिमण्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “चिमणी वाचवणे म्हणजे पर्यावरणाचे संतुलन राखणे होय.” प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन इको क्लब प्रभारी देविदास दळवी यांनी उत्कृष्टरीत्या केले. या उपक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

एकूणच, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि पक्ष्यांविषयी संवेदनशीलता रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.

30
4203 views

Comment