अमरापूर नगरीत आजपासून भक्तिचैतन्य! श्री पांडुरंग अखंड हरिनाम सप्ताहाचा थाटात प्रारंभ
शेवगाव (अमरापूर): टाळ-मृदंगाचा गजर आणि 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या जयघोषात अमरापूर येथे आजपासून श्री पांडुरंग अखंड हरिनाम सप्ताहाचा मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यासाठी संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी हरिभक्त रामगिरी महाराज येळीकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजनाने सप्ताहाची oसुरुवात करण्यात आली. या सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, विष्णूसहस्रनाम पठण, गाथा भजन आणि सायंकाळी नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांसाठी हा सप्ताह म्हणजे पर्वणीच असून, अमरापूर नगरी विठ्ठलमय झाली आहे.
सप्ताहाच्या काळात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थांनी आणि उत्सव समितीने भाविकांना दर्शनासाठी आणि कीर्तन श्रवणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सप्ताहाची सांगता भव्य काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने होणार आहे.