भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथे शेतमजूर महिलांचा सन्मान व रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जळगांव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुकर्मा प्रो व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, जळगांव व सार्थक सिद्ध सेवा फाऊंडेशन, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथे शेतमजूर महिलांचा सन्मान व रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचे स्वीय सहाय्यक हेमंतजी रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कंपनीच्या डायरेक्टर तथा फाऊंडेशनच्या संचालिका लक्ष्मीताई कुमावत उपस्थित होत्या. तसेच वंदना ताई पाटील, स्नेहा ताई सोनवणे, विजया ताई पांडे, कविता ताई पाटील, सुरेखा ताई तायडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास परिसरातील महिला, ग्रामपंचायत सदस्य तसेच उपसरपंच यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात लक्ष्मीताई कुमावत यांनी महिलांना घरबसल्या कामाच्या संधींपासून ते स्वतःचा लघुउद्योग कसा स्थापन करावा, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच विविध शासकीय व कंपनीच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, व्यवसायाची सुरुवात, भांडवल व्यवस्थापन, बाजारपेठेची निवड आणि व्यवसाय वाढीचे मार्ग यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
याशिवाय महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमात कष्टकरी शेतमजूर महिलांचा शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला.
उपस्थित मान्यवरांनी महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.