संगमनेर हादरले! वडगाव पान येथे ६ वीच्या विद्यार्थिनीवर अमानुष ॲसिड हल्ला; अज्ञात नराधम पसार
अहिल्यानगर:जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वडगाव पान परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या इयत्ता ६ वीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वडगाव पान येथील शाळेत ६ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांपूर्वी सकाळी शाळा भरत असल्याने, शाळा सुटल्यानंतर ही मुलगी आपल्या घराच्या दिशेने चालली होती. ती गावातील रस्त्यावरून जात असताना अचानक एका अज्ञात तरुणाने तिच्या समोर येत तिच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ (ॲसिड) फेकून तिथून पोबारा केला.
हल्ल्यानंतर ही चिमुरडी वेदनेने विव्हळू लागली. तिचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावले. मुलीची गंभीर अवस्था पाहून तिला तातडीने लोणी येथील प्रवरा नगर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकाने परिसराची पाहणी केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.
पीडित मुलीचे वडील हयात नसून तिची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अत्यंत गरिबीत शिक्षण घेणाऱ्या या निष्पाप मुलीवर अशा प्रकारे हल्ला का झाला? याचे गूढ अद्याप कायम आहे.