जिल्ह्यात १७ ते १९ मार्च कालावधीत वादळी पावसाची शक्यता
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर, दि.१७:- भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस व विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी १८ व १९ मार्च रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडांखाली, मोकळ्या मैदानात, विजेचे खांब व लोखंडी कुंपणाजवळ उभे राहू नये. वीज कोसळण्याची शक्यता असल्याने या काळात विजेच्या उपकरणांचा वापर टाळावा व ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे यांसारख्या सुवाहक वस्तूंपासून दूर राहावे. घराबाहेर मोकळ्या जागेत अडकल्यास गुडघ्यांवर बसून कान व डोके झाकून सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
जाहिरात फलक कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याजवळ थांबणे टाळावे. धरणे, नद्या व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये व धोकादायक ठिकाणी फोटो काढणे टाळावे. शेतकऱ्यांनी वादळी वारा व पावसापासून शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, तसेच काढणीस आलेला शेतमाल व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर व ०२४१ - २३२३८४४ या दूरध्वनीवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. गिते यांनी केले आहे.
#महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #WeatherAlert #AhilyanagarNews #RainWarning #YellowAlert #FarmerAlert #DisasterManagement #SafetyFirst #MaharashtraWeather #Thunderstorm #EmergencyContacts #CropProtection #StaySafe #अहिल्यानगर_प्रशासन