logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विद्यार्थ्यांनी घेतला डिजिटल पोर्टेबल तारांगणाचा अनोखा अनुभव



* सृजन इंग्लिश ज्ञानपीठात विज्ञानप्रबोधनाचा उपक्रम; १२०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

देवळी तालुका प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा तसेच खगोलशास्त्राविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल पोर्टेबल तारांगण या उपक्रमाला देवळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सृजन इंग्लिश ज्ञानपीठ येथे आयोजित या कार्यक्रमात सुमारे १२०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून नभगंगाचा अनोखा अनुभव घेतला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखा व देवळी शाखेच्या संयुक्त विद्यमाने तसेच सृजन इंग्लिश ज्ञानपीठ यांच्या पुढाकारातून शाळेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, सृजन इंग्लिश स्कूलच्या संस्थापक डॉ. श्रद्धा चोरे, प्राचार्या प्रिया वैद्य, देवळी कार्याध्यक्ष विक्की बिजवार, प्रधान सचिव विजय पचारे, पत्रकार रविंद्र पारीसे, पत्रकार शंकर केवदे, महिला अध्यक्ष अनुराधा उटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गजेंद्र सुरकार यांनी ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, गुरू, शनी तसेच आकाशगंगा यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. डिजिटल पोर्टेबल तारांगणाच्या माध्यमातून अवकाशातील विविध घटना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात समजावून सांगण्यात आल्या. आकाशगंगेतील ग्रह आपल्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम करत नाहीत, त्यामुळे अंधश्रद्धेला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कोणतीही गोष्ट स्वीकारताना तिची चिकित्सक तपासणी करून विज्ञाननिष्ठ विचारसरणी अंगीकारावी, असेही त्यांनी आवाहन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी कृत्रिमरित्या उभारलेल्या फुगविलेल्या डोममध्ये प्रवेश करून ब्रह्मांड, सूर्यमाला, पृथ्वीची निर्मिती, प्राणी-पक्षी व मानवाचा उत्क्रांती प्रवास याबद्दल माहिती घेतली. तसेच कोपर्निकस व गॅलिलिओ यांसारख्या शास्त्रज्ञांचे खगोलशास्त्रातील योगदान, सूर्यग्रहण-चंद्रग्रहण, पौर्णिमा-अमावस्या तसेच आकाशगंगेत घडणाऱ्या विविध खगोलिय घटनांचा वैज्ञानिक कार्यकारणभाव विद्यार्थ्यांनी जाणून घेतला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रद्धा चोरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते ज्ञान मर्यादित न ठेवता अशा प्रात्यक्षिक उपक्रमांतून विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. डिजिटल तारांगणासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होते आणि भविष्यातील वैज्ञानिक घडण्यास प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा दूर ठेवून वैज्ञानिक विचारसरणी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान डिजिटल पोर्टेबल तारांगणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देवळी तालुका अध्यक्षपदी डॉ. श्रद्धा चोरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पचारे यांनी केले, तर प्रास्ताविक विक्की बिजवार यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशांत खोब्रागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा घोडे, मधुकर तेलंग तसेच सृजन इंग्लिश स्कूलचे शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

3
255 views

Comment