logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एच.पी.व्ही . व्हॅक्सीन: समज आणि गैरसमज

कर्करोगापासून बचावाचा प्रभावी उपाय

भारतात दरवर्षी सुमारे १.२५ लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या (cervical) कर्करोगाची निदान होते आणि यात सुमारे ७५,००० ते ८०,००० महिलांचा मृत्यू होतो. जगातील सर्व कर्करोगांपैकी एक-पंचमांश प्रकरणे भारतात आहेत. हे कर्करोग जवळजवळ ९९% प्रमाणात Human Papillomavirus (HPV) या विषाणूमुळे होतो. पण आता ही दुःखद कहाणी बदलण्याची संधी आहे! फेब्रुवारी २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी मोफत HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे. १४ वर्षांच्या मुलींसाठी ही लस मोफत आणि स्वैच्छिक आहे. तरीही सोशल मीडियावर गैरसमज आणि अफवा वेगाने पसरत आहेत. या लेखात HPV व्हॅक्सीनचे वैज्ञानिक सत्य, फायदे आणि सामान्य गैरसमज यावर सविस्तर चर्चा करूया.
HPV विषाणू म्हणजे काय आणि तो किती धोकादायक?

HPV हा एक सामान्य विषाणू आहे. तो लैंगिक संबंधांद्वारे पसरतो. जगातील बहुतेक लोकांना आयुष्यात कधी ना कधी HPV होतो. याचे २०० हून अधिक प्रकार आहेत, त्यातले काही (मुख्यतः टाइप १६ आणि १८) गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, गुदाशयाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, पुरुषांचा लिंगाचा कर्करोग, योनी आणि योनीबाह्य भागांचा कर्करोग तसेच जननेंद्रियांवर येणारे मस्से (warts) यांना कारणीभूत ठरतात. भारतात १६ आणि १८ या दोन प्रकारांमुळे ७०% गर्भाशय कर्करोग होतो. लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत, म्हणूनच नियमित तपासणी आणि लसीकरण महत्त्वाचे.

HPV व्हॅक्सीन काय आहे? ती कशी काम करते?
HPV व्हॅक्सीन ही विषाणूची नक्कल (virus-like particles) असलेली लस आहे. ती प्रत्यक्ष विषाणू देत नाही, तर शरीराला प्रतिकारक शक्ती (antibodies) तयार करण्यास शिकवते. भारतात सुरू झालेल्या मोहिमेत Gardasil-4 (MSD कंपनीची) लस वापरली जात आहे. ती HPV टाइप ६, ११, १६ आणि १८ विरुद्ध संरक्षण देते. WHO ने २०२२ पासून ९ ते २० वर्षांच्या मुलींसाठी एक डोस पुरेसा असल्याचे मान्य केले आहे. (HIV किंवा इतर कमकुवत रोगप्रतिकारक असणाऱ्यांसाठी दोन-तीन डोस).
लस ९-१४ वर्षांच्या वयात घेतल्यास ९०% पेक्षा जास्त प्रभावी. स्वीडनच्या अभ्यासानुसार १७ वर्षांखालील मुलींमध्ये कर्करोगाचा धोका ८८% कमी झाला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसारख्या देशांत १५ वर्षांच्या लसीकरणानंतर गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग आणि प्री-कॅन्सर जवळजवळ नाहीसे झाले आहेत.

भारतातील नवीन सरकारी योजना
लक्ष्य: दरवर्षी १.१५ ते १.२ कोटी १४ वर्षांच्या मुली.
वेळ: फेब्रुवारी २०२६ पासून देशभर सरकारी आरोग्य केंद्रांवर.
स्वरूप: स्वैच्छिक, पालकांची संमती अनिवार्य. U-WIN अॅपवर नोंदणी.
खर्च: पूर्ण मोफत (GAVI Alliance च्या मदतीने २.६ कोटी डोस).
भविष्य: दोन वर्षांनंतर स्वदेशी Cervavac लस उपलब्ध होईल.
पूर्वी सिक्कीम, पंजाब, दिल्लीत छोट्या मोहिमा यशस्वी झाल्या होत्या.
सामान्य गैरसमज आणि वैज्ञानिक सत्य (मिथक vs फैक्ट)

गैरसमज १: ही लस फक्त मुलींसाठी आहे.
सत्य: मुलींना गर्भाशय कर्करोगापासून वाचवण्यासाठी प्राधान्य दिले आहे. पण मुलांनाही घशा, गुदाशय आणि लिंगाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. CDC ने सर्व २६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी शिफारस केली आहे.

गैरसमज २: लस वंध्यत्व (infertility) कारणीभूत ठरते.
सत्य: जगभर २० वर्षे आणि १३५ दशलक्ष डोसांवर केलेल्या अभ्यासात (CDC, WHO) कोणताही संबंध सापडला नाही. उलट, कर्करोग टाळल्याने भविष्यातील उपचारांमुळे होणारे वंध्यत्व रोखले जाते. ६०८ अभ्यासांचा आढावा घेतल्यावर WHO ने स्पष्ट केले – काही दुर्मिळ प्रकरणे ‘temporal association’ होती, कारण नव्हते.

गैरसमज ३: लस लैंगिक संबंध लवकर सुरू करण्यास प्रोत्साहन देते.
सत्य: CDC च्या अभ्यासात लसीकरण आणि लैंगिक वर्तणूक यात काहीही संबंध नाही. मुलींच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नाही.
गैरसमज ४: पूर्वीच्या ट्रायल्समध्ये मुलींचा मृत्यू झाला.
सत्य: २०१० मध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये २५,००० मुलींवर झालेल्या प्रायोगिक प्रकल्पात ७ मृत्यू झाले. संसदीय समितीने स्पष्ट केले – साप चावणे, बुडणे, आत्महत्या यासारखे कारणे. लसीशी संबंध नव्हता. समस्या ‘सहमती’च्या नैतिक मुद्द्याची होती, लसीची सुरक्षिततेची नव्हती. आज जगभरात १६० हून अधिक अभ्यास आणि VAERS सारखे सिस्टम हे सिद्ध करतात की लस सुरक्षित आहे.

गैरसमज ५: तीन डोस घ्यावे लागतात आणि महाग आहेत.
सत्य: ९-१४ वर्षांच्या मुलींसाठी एक डोस पुरेसा (WHO २०२२). आता सरकारी मोहिमेत मोफत.

गैरसमज ६: लस घेतल्याने कर्करोग होतो किंवा गंभीर साइड इफेक्ट्स.
सत्य: सामान्य साइड इफेक्ट्स – इंजेक्शनच्या जागी वेदना, सूज, हलके ताप, डोकेदुखी (१-२ दिवस). गंभीर समस्या अत्यंत दुर्मिळ (फॅainting चे प्रमाण जास्त, म्हणून १५ मिनिटे बसून राहा). मृत्यू, ऑटोइम्यून आजार किंवा इतर गंभीर समस्या यांचा कोणताही पुरावा नाही.

लस घ्यायची की नाही? निर्णय घ्या !
WHO, CDC, ICMR आणि भारत सरकार यांचा सल्ला एकच – ९ ते १४ वर्षांच्या मुलींना लस घ्या. लस घेतल्याने केवळ वैयक्तिक संरक्षण नव्हे, तर समूह संरक्षण (herd immunity) निर्माण होते आणि भावी पिढ्यांतील कर्करोग कमी होईल. ऑस्ट्रेलियात HPV संसर्ग २२.७% वरून १.५% वर आला.
निष्कर्ष: जागरूकता हाच खरा उपाय
HPV व्हॅक्सीन ही कर्करोग रोखण्याची पहिली आणि सर्वात प्रभावी ‘व्हॅक्सीन’ आहे. गैरसमज सोडून वैज्ञानिक सत्य समजून घ्या. पालकांनी मुलींना १४ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लस द्या. सरकारी केंद्रांवर मोफत उपलब्ध आहे. नियमित पेप स्मियर तपासणीही चालू ठेवा.
आरोग्यविषयक निर्णय घेताना अफवा किंवा अपूर्ण माहितीपेक्षा विश्वसनीय संशोधनावर आधारित विचार करणेच समाजासाठी हिताचे ठरते.

रवींद्र खानंदे
चिखली .

(संदर्भ: WHO, CDC, PIB, Indian Express, India Today – मार्च २०२६ पर्यंतचे अद्ययावत आकडे )

0
2300 views

Comment