कोरेगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक दीपिका मुसळे निलंबित; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची कडक कारवाई
कोरेगाव : कोरेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांना अखेर निलंबित करण्यात आले असून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ही कडक कारवाई केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त झालेल्या विविध तक्रारी आणि प्राथमिक चौकशीतील निष्कर्षांच्या आधारे हे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत स्थानिक नागरिक आणि विविध प्रकरणांतील पक्षकारांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. विशेषतः उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांच्या कार्यपद्धतीबाबत वरिष्ठांकडे अनेक गंभीर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर कर्तव्यात कसूर आणि शिस्तभंग झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलातील शिस्त आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा नागरिकांच्या तक्रारी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे.
या निलंबनामुळे कोरेगाव पोलीस ठाण्यात खळबळ उडाली असून पुढील काळात पोलीस ठाण्याच्या कारभारात सुधारणा होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.