logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

१५ मार्च : मान्यवर कांशीरामजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख ::

१५ मार्च : मान्यवर कांशीरामजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख ::

बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी..!

भारताच्या राजकीय व सामाजिक क्षितिजावरील एक लखलखणारा सितारा म्हणजे बहुजन मसिहा, बहुजन नायक, बहुजन चळवळीचे प्रेरणास्थान महानायक कांशीरामजी. बहुजन समाजात सामाजिक व राजकीय आस्था, महत्त्वाकांक्षा जागृत करणारे व बहुजन समाजाची सत्ता प्रस्थापित होऊ शकते असा प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे मान्यवर साहेब कांशीराम जी यांचा जन्म पंजाब राज्यातील रोपड जिल्ह्यातील खवासपूर तालुक्यातील बुंगा ग्राम या छोट्याशा खेडेगावात साधारण रामदासिया शिख चर्मकार व शेतकरी कुटुंबात दिनांक १५ मार्च १९३४ रोजी झाला.
मान्यवर कांशीराम जी यांनी बहुजन या शब्दाची विस्तृत व्याख्या केली व त्याचा वापर करुन दलित शोषित उपेक्षित बहुजन समाजाला जागे करण्याचे काम केले, म्हणून तर मान्यवर कांशीराम जी यांच्या बाबतीत आजही एक नारा दिला जातो, "कांशी तुम्हारी नेक कमाई, सोती हुई कौम जगाई!" हजारो वर्ष आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित बहुजन समाजाला जागे करण्याचे महान क्रांतिकारी ऐतिहासिक कार्य मान्यवर कांशीराम जी यांनी केले आहे.
१५ मार्च १९३४ रोजी दलित चर्मकार समाजात जन्म झाल्यानंतर स्वतःला हीन दीन न समजता किंवा हीन कर्माच्या आहारी न जाता कांशीराम जी यांनी शिक्षणाचा मार्ग धरला. त्यांनी रोपड येथील शासकीय महाविद्यालयातून बीएससी (B.Sc.) म्हणजे ब्याचलर ऑफ सायन्स (विज्ञान) ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील संरक्षण उत्पादन विभागात (गोळा-बारुद कारखाना) वर्ग १ चा अधिकारी म्हणून नोकरी केली.
याच कार्यालयात दिना भाना हे राजस्थानमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कामाला होते. कार्यालयाने वार्षिक सुट्ट्यांची यादी जाहिर केली त्यात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुट्ट्या देण्यात आल्या नव्हत्या. याबाबत दिना भाना यांनी आक्षेप घेतला. कार्यालयातील सर्व उच्चवर्णीय अधिकाऱ्यांना दिना भाना यांचा राग आला. त्यांनी दिना भाना यांना सुट्टी पाहिजे की नोकरी ? असा प्रश्न विचारला. यावर दिना भाना यांनी उत्तर दिले की, दोन्ही पाहिजे !
कार्यालयाने दिना भाना यांना गैरशिस्त म्हणून नोकरीवरुन काढून टाकले. याच्या विरोधात दिना भाना यांनी संघर्ष सुरू केला. कांही दलित कर्मचारी त्यांच्या मदतीला धाऊन आले होते परंतु उच्चवर्णीय अधिकारी कुणालाही घाबरत नव्हते. आर पी आयच्या लोकांनीही प्रकरण हाताळले पण प्रशासन नमत नव्हते. कांशीराम जी यांच्या कानावर हे प्रकरण आले परंतु त्यांनाही वाटत होते की सुट्टीसाठी नोकरी का गमवायची ? दिना भाना मूर्ख आहे असे त्यांना वाटत होते.
या दरम्यान डी. के. खापर्डे हे दलित कर्मचारी कांशीराम जी यांच्या संपर्कात आले. त्यांनी "जाती संस्थेचे विच्छेदन" हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक कांशीराम जी यांना वाचायला दिले. सुरुवातीला हे पुस्तक वाचणे त्यांना अवघड वाटत होते पण रात्री जेंव्हा त्यांनी या पुस्तकात मुंडी घातली तर सकाळपर्यंत त्यांनी मान वर केली नाही. रात्रभर त्यांनी हे पुस्तक वाचून त्याची अनेकदा उजळणी केली तेंव्हा त्यांना कळले की आंबेडकरवाद काय आहे ते ! दिना भाना सुट्टी का मागत होता याचा त्यांना उलगडा झाला.
दुसऱ्या दिवशी कांशीराम जी यांनी दिना भाना यांना आपल्या केबिनमध्ये बोलाऊन घेतले आणि त्याच्यासाठी लढण्याची ग्वाही दिली. एक क्लासवन अधिकारी असूनही एका चतुर्थ श्रेणी कामगारासाठी कांशीराम जी यांनी जन आंदोलन उभारले. असंख्य बैठका व मेळावे घेतले, राजकीय पुढाऱ्यांना घेराव घातले पण केंद्र सरकारच्या या संरक्षण उत्पादन कार्यालयात उच्चवर्णीय अधिकाऱ्यांची मनमानी थांबता थांबत नव्हती म्हणून शेवटी कांशीराम जी यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
न्यायालयाने दिना भाना यांच्या बाजूने निर्णय दिला. कांशीराम जी यांनी न्यायालयाचा आदेश हातात घेऊन वाजत गाजत दिना भाना यांना संरक्षण उत्पादन कार्यालयात नेऊन तेथे नोकरीवर रुजू होण्यास सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार दिना भाना कामावर रुजू झाले आणि दुसऱ्याच क्षणी कांशीराम जी यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. यामुळे सोबतचे सारे संवगडी आश्चर्यचकित झाले.
एका कार्यालयात एवढा अन्याय तर देशभर काय परिस्थिती असेल ? याचा विचार करुन कांशीराम जी यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. सुरुवातीला SC, ST Employees Welfare Association (अनुसूचित जाती जमाती कर्मचारी कल्याण संघटना) सुरु केले. पुणे जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती जमातीचे कर्मचारी संघटित करण्यासाठी सायकलवरुन दौरे केले. आरक्षणामुळे नोकरीला लागलेले कर्मचारी संघटित केले तर ते वेळ, पैसा आणि बुद्धी देऊ शकतात. त्यांच्यात फक्त सामाजिक जाणीव निर्माण करणे जरुरीचे आहे असा विचार करुन कांशीराम जी यांनी कर्मचाऱ्यांचे संघटन देशभर वाढविण्याचा निर्धार केला.
तिकडे गावाकडे कांशीरामजी यांची आई आपल्या मुलाच्या लग्नाची स्वप्ने पाहत होती तर इकडे कांशीरामजी यांनी आपल्या आईला ३५ पानाचे पत्र लिहून कळवून टाकले की आज पासून कांशीरामजी मरण पावले आहेत असे समजा. मी लग्न करणार नाही, घरी येणार नाही, बँकेत खाते उघडणार नाही, स्वतःच्या नावावर देशात कुठेही जमीन घेणार नाही अशा कठोर शपथा त्यांनी आपल्या आईला कळविल्या, तेव्हापासून संघटनेचे कार्यालय हेच आपले घर या पद्धतीने ते वागत राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ६ डिसेंबर १९७१ रोजी कांशीरामजी यांनी दिल्ली येथे बामसेफ (बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन) या कर्मचारी संघटनेची स्थापना केली व यासाठी त्यांनी देशभर दौरे सुरू केले. देशाच्या विविध भागात कर्मचारी प्रशिक्षण शिबिरे घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी संघटित केले. अशा परिस्थितीत समाजावर अन्याय झाला तर कर्मचारी रस्त्यावर येऊन संघर्ष करू शकत नाहीत म्हणून एखादी लढाऊ सामाजिक संघटना असावी या उद्देशाने कांशीरामजी यांनी ६ डिसेंबर १९८१ रोजी "डी एस फोर" ही सामाजिक संघटना स्थापन केली. "दलित शोषित समाज संघर्ष समिती" असे या संघटनेचे नाव निश्चित करण्यात आले आणि सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये देशभर रस्त्यावरील आंदोलने सुरू केली.
कर्मचारी आणि सामाजिक संघटनेच्या यशस्वीतेनंतर राजकीय संघटन निर्माण करावे असा विचार कांशीरामजी यांनी बोलून दाखवायला सुरुवात केली, त्यास मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागल्याने दिनांक १४ एप्रिल १९८४ रोजी दिल्ली येथे बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. अशा पद्धतीने तीन आघाड्यावर मान्यवर साहेब कांशीराम जी हे एकाकी झुंज देत होते. त्यांना बहन मायावती जी यांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली. राजकीय आघाडी त्यांनी स्वतः समर्थपणे सांभाळली होती. त्यामुळे त्या उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या प्रदेशाच्या चार वेळा मुख्यमंत्री होऊ शकल्या. याचे सारे श्रेय मा. कांशीराम जी यांना जाते.
थोर भारतीय समाजसुधारक, विचारवंत, दलित आणि बहुजन चळवळीचे महान क्रांतिकारी क्रियाशील नेते म्हणून कांशीरामजी यांनी नाव कमावले होते. दलितांना, मागासवर्गीयांना आणि अल्पसंख्याकांना राजकीय शक्ती बनवण्यासाठी त्यांनी बामसेफ, डीएस ४ आणि १९८४ मध्ये बहुजन समाज पार्टी (BSP) ची स्थापना केली. "ज्याची जेवढी संख्या भारी, त्याची तेवढी भागीदारी" हा त्यांचा मुख्य नारा होता.
कांशीरामजी यांनी जातीवादाविरुद्ध लढा दिला आणि बहुजन समाजाला (दलित, आदिवासी, मागासवर्गीय, मुस्लिम) सत्तेत 'भागीदार' बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी मायावतींना उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठे स्थान मिळवून दिले. दीर्घ आजारानंतर ९ ऑक्टोबर २००६ रोजी दिल्ली येथे कांशीराम जी यांचे निधन झाले. कांशीरामजींनी आयुष्यभर साधे जीवन जगून उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढा दिला, त्यामुळे त्यांना 'मान्यवर' आणि 'बहुजन नायक' म्हणून देश व दुनियेत आजही सन्मानले जाते. त्यांचा समर्थ वारसा आज बहन कु. मायावतीजी ह्या समर्थपणे सांभाळीत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही कांशीरामजी यांना केलेले खरे अभिवादन ठरू शकते.

*इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर*
प्रदेश कार्यकारिणी सदस्य,
बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र
मो. 7066210194

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
775 views

Comment