मुरबाड तालुक्यात वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे सर्पदंशाने महिलेचा दुर्दैवी मृत्यू ..
जि. ठाणे | मुरबाड तालुका
मुरबाड तालुक्यात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सर्पदंशाच्या घटनांमध्ये नागरिकांचे जीव जात असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुरबाड तालुक्यातील चिखले येथे सर्पदंशामुळे एका महिलेचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कै. सौ. भारती नारायण भोईर (वय ४५) या सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास स्वयंपाकासाठी घरामागील शेतातून सरपण आणण्यासाठी गेल्या असताना सरपणाच्या फाट्यामध्ये दबा धरून बसलेल्या विषारी नाग सर्पाने त्यांच्या उजव्या पायाला दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ही बाब आपल्या जाऊबाई सौ. संगीता भोईर यांच्या निदर्शनास आणून दिली.
घटना मुरबाड तालुक्यातील चिखले गावात घडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुरबाड येथे दाखल केले. मात्र, तेथे आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार त्यांना उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. योग्य वेळी उपचार मिळून शकल्यामुळे सायंकाळी सुमारे ८.०० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या दुर्दैवी घटनेमुळे भोईर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिखले गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, दिर आणि जाऊबाई तसेच असा परिवार आहे .
दरम्यान, दुसरी एक घटना देखील मुरबाड तालुक्यातील पिंपळगाव येथील विवेक वाघ (वय ६ वर्षे) या चिमुकल्यालाही सर्पदंश झाला . असून त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी महाराष्ट्र शासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. मध्य प्रदेश राज्यात सर्प किंवा विंचू दंशामुळे एखादी व्यक्ती बाधित, मृत किंवा कायमस्वरूपी अपंग झाल्यास शासनाकडून संबंधित कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही अशी योजना राबवून सर्प-विंचू दंशामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच राज्यातील सर्व शासकीय जिल्हा रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सर्प व विंचू दंशग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक औषधे, प्रतिविष (Anti-venom) व अत्यावश्यक उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून उपचाराअभावी कोणत्याही नागरिकाचा जीव जाऊ नये, अशीही विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली यांच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र म्हणून कार्यकर्ते श्री. प्रिये साळवे, श्री. साहिल भवार, श्री. प्रवीण भालेराव आणि श्री. वैभव पद्माकर कुलकर्णी यांनी चिखले येथे जाऊन कै. भारती नारायण भोईर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
– निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली
https://youtu.be/qvMglvEEZjE?si=s9Ds8IdXMZTKyp7v