logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

संपूर्ण शिक्षण मोफत करा; रयत शेतकरी संघटनेचे केंद्रे प्रकाश यांचे शासनाला निवेदन जिल्हा परिषद शाळा बळकट करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा,

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत उपलब्ध करून द्यावे तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बळकट करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष केंद्रे प्रकाश मधुकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
सदर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, मुख्य सचिव, शिक्षणमंत्री तसेच शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा प्रगतीचा मुख्य मार्ग असून आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीत जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या घट, शाळा विलीनीकरणाचे निर्णय, शिक्षकांची कमतरता तसेच अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ग्रामीण भागातील शाळा मजबूत करण्यासाठी विशेष धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश तसेच आधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरून शिक्षणाचा दर्जा सुधारावा, असेही केंद्रे यांनी म्हटले आहे.
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून शासनाने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केंद्रे प्रकाश यांनी दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयाने सदर ई-मेल प्राप्त झाल्याची नोंद देत तो पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.

0
0 views

Comment