१००% अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना आता ‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ
जळगांव दिनांक १४/०३/२०२६
राज्यातील १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) ५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, जिल्हा परिषद तसेच खाजगी १००% अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आता आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मध्ये समावेश करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळणार असून, प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे.
आयुष्मान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करणे, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक अशा दोन्ही आरोग्यांना संरक्षण देणे, हेल्थकेअरला समग्रपणे संबोधित करण्यासाठी या योजनेचे उद्दीष्ट आहे. यामध्ये आरोग्य आणि निरोगीकरण केंद्रे आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या दोन प्रमुख आरोग्य उपक्रमांचा समावेश आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते
राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारच्या या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत असून, यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवेचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे.
=================