logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मटका-जुगार अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी; प्रिया शिंदे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

मटका-जुगार अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी; प्रिया शिंदे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
आर्णी : प्रतिनिधी
आर्णी शहरामध्ये सुरू असलेले मटका व जुगाराचे अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रिया शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, आर्णी शहरात सध्या मटका व जुगाराचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून ते सर्रासपणे खुलेआम चालत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. या अवैध धंद्यांमुळे शहरातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवक वर्ग चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात हे धंदे उघडपणे सुरू असतानाही स्थानिक स्तरावर अपेक्षित ती प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून त्यामुळे नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांच्या मागे कोणते अदृश्य संरक्षण कार्यरत आहे का, अशी शंका देखील नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी आर्णी शहरानजीक सुकई परिसरातील एका पंजाबी हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात एम.डी. (MD) प्रकारचे अमली पदार्थ जप्त झाल्याची घटना समोर आली होती. आर्णी सारख्या छोट्या शहरात अशा प्रकारची घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे शहरातील मटका व जुगाराचे अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात यावेत तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय अशा अवैध धंद्यांच्या मागे कोणते संरक्षण कार्यरत आहे का याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या निवेदनानंतरही योग्य ती कारवाई झाली नाही तर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही प्रिया शिंदे यांनी दिला आहे.

0
19 views

Comment