मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या विविध समस्यांव
मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या विविध समस्यांवर राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव श्री. विनायक निपुण तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हानिहाय आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून मी गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर ठाम भूमिका मांडून विशेष पाठपुरावा केला.
ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अनेक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अँटिव्हेनम इंजेक्शन उपलब्ध असले तरी प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता असल्याने वेळेवर उपचार होत नाहीत आणि त्यामुळे अनेकांचा जीव जातो. यावर उपाय म्हणून ग्रामीण रुग्णालयांतील डॉक्टरांना सर्पदंश उपचाराबाबत विशेष प्रशिक्षण देण्याची मागणी केली.
गडचिरोली जिल्हा मलेरियाची राजधानी म्हणून ओळखला जातो. मात्र जिल्हा मलेरिया अधिकाऱ्याचे पद दीर्घकाळ रिक्त आहे. ते तातडीने भरण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्यात क्षयरोग (टीबी) रुग्णांचे प्रमाणही मोठे असल्याने गडचिरोली येथे क्षयरोग रुग्णालय स्थापन करण्याची मागणी केली.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे ट्रॉमा केअर युनिट सुरू करणे, घोट (ता. चामोर्शी) व पेंढरी (ता. धानोरा) येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणीही बैठकीत मांडली. तसेच चिकलसेल आजाराबाबत आरोग्य यंत्रणेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कोविड काळात खरेदी करण्यात आलेली अनेक वैद्यकीय यंत्रसामग्री सध्या वापरात नसून ती ग्रामीण रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा मिळू शकतील, असा मुद्दाही मांडला.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग विभागात रुग्णांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. शस्त्रक्रिया वेगाने व्हाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
जिल्ह्यातून पदोन्नती होऊन इतरत्र बदली झालेल्या डॉक्टरांना पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती देण्याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याबाबत शासन निर्णय अंतिम टप्प्यात असून ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.
चामोर्शी व धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयांच्या बांधकामासाठी निधी तातडीने उपलब्ध करून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश माननीय मंत्री महोदयांनी दिले. तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीत लवकरात लवकर सेवा सुरू करून आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्याबाबतही पाठपुरावा करण्यात आला. येणाऱ्या पदभरती प्रक्रियेत या रुग्णालयातील कर्मचारी कमतरता निश्चित भरून निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलिनीकरण करू नये, अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडली.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी माझा पाठपुरावा पुढेही कायम राहील.