दंड वसुलीसाठी कोणतीही अनावश्यक सक्ती करू नये. अप्पर पोलीस महासंचालक यांचा आदेश
अप्पर पोलीस महासंचालकांचे ट्रॅफिक पोलिसांना कडक निर्देश
राज्यातील रस्ते वाहतूक पोलिसांच्या वर्तणुकीबाबत आणि दंड वसुलीच्या पद्धतीबाबत अनेक तक्रारी समोर येत असतानाच, वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी संपूर्ण राज्यभरातील ट्रॅफिक पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यापुढे रस्त्यावर वाहनचालकांना अडवल्यानंतर त्यांच्याशी अत्यंत सौजन्याने आणि आदराने वागण्याचे आदेश देण्यात आले असून, दंड वसुलीसाठी कोणतीही अनावश्यक सक्ती करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अप्पर पोलीस महासंचालकांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, वाहतूक पोलिसांचे मुख्य काम हे रस्ते सुरक्षा राखणे आणि वाहतूक सुरळीत करणे हे आहे, केवळ दंड वसुली करणे नव्हे. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांशी अरेरावी केली जाते किंवा वसुलीसाठी दबाव टाकला जातो, ज्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना संयम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या नव्या निर्देशांनुसार, जर एखाद्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केले असेल, तर त्याला कायद्यानुसार दंड आकारला जावा, मात्र हे करत असताना त्याच्याशी वाद घालणे किंवा अपमानास्पद वागणूक देणे टाळावे. तसेच, प्रलंबित दंड वसुलीच्या मोहिमेदरम्यान वाहनचालकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी ५ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत बैठक बोलावली होती.