logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दौंडकरांवर आले मोठे संकट... घरी स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळेना; हॉटेल, खाणावळींवरही मोठा परिणाम, ८० टक्के हॉटेल होणार बंद?

दौंड : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. याचे दोन विरुद्ध परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत. एका बाजूला निर्यात ठप्प झाल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे आयातीवर परिणाम झाल्याने खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
या युद्धाचा थेट परिणाम सर्वसामान्य दौंडकरांच्या दैनंदिन जगण्यावर झाला आहे. स्वयंपाकघरातील सिलिंडर मिळणे तर दूरच; पण तो नोंदविण्यासाठी (बुकिंग) संघर्ष करावा लागतो आहे. अवघ्या आठवड्यात युद्धाची धग घराघरापर्यंत पोहोचल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सिलिंडर मिळण्यासाठी सुरू असलेली ससेहोलपट थांबवावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिलिंडर नोंदविण्यामध्येच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काही ठिकाणी सिलिंडर नोंदविण्यासाठीच्या संपर्क क्रमांकावरून काही प्रतिसादच मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा नागरिकांनी सिलिंडर घेऊन थेट गॅस एजन्सी गाठल्याने शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी सिलिंडरच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
गॅस एजन्सीकडे आवश्यक सिलिंडरचा साठा नसल्याने नागरिकांना उन्हामध्ये ताटकळत थांबावे लागते आहे. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबविला असला, तरी घरगुती सिलिंडरच्या पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत, असा दावा सरकारकडून केला जात असला, तरी घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांना खटाटोप करावे लागत आहेत.

केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर मर्यादा आणल्याने दौंड शहरातील बहुसंख्य हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी; तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. व्यावसायिकांकडे केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरल्याने येत्या काही दिवसांत पुण्यातील सुमारे ८० टक्के हॉटेल बंद पडण्याची भीती आहे.
गॅस उपलब्ध असेपर्यंत हॉटेल सुरू राहतील. मात्र, साठा संपल्यानंतर दोन-तीन दिवसांत अनेक हॉटेल बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉटेल उद्योगासह वडापाव, चायनीज, अमृततुल्ये आणि इतर व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची भीती आहे.

28
1500 views

Comment