logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धगधगता वाडा: विषारी टायर कंपन्यांविरुद्ध एल्गार! चिंचघर येथे १४ मार्चला 'आरपारची लढाई'

वाडा (प्रतिनिधी):
एकेकाळी निसर्गरम्य आणि हिरवागार असलेला वाडा तालुका आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. परदेशातील टाकाऊ टायर आणून ते वाड्यातील मातीत जाळले जात असून, यामुळे इथली हवा विषारी आणि पाणी काळे पडले आहे. या गंभीर प्रश्नावर आता वाडावासीय आक्रमक झाले असून, भ्रष्ट प्रशासन आणि प्रदूषणकारी कंपन्यांविरुद्ध शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी चिंचघर येथे एका भव्य निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
काय आहे मुख्य प्रश्न?
गेल्या दीड-दोन वर्षांपासून वाडा तालुक्यातील उसर, दिनकरपाडा, वडवली, बिलोशी, कोनसई, पालसई, सापने, कोने, खरिवली, नेहरोली आणि तोरणे यांसारख्या अनेक गावांमध्ये बेकायदेशीर टायर जाळणाऱ्या कंपन्यांचे पेव फुटले आहे. या कंपन्यांमुळे परिसरात श्वसनाचे विकार वाढले असून, भविष्यात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांची भीती निर्माण झाली आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर संताप
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि संबंधित सरकारी अधिकारी या कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी डोळेझाक करत आहेत. "आमच्या लेकरांच्या आरोग्यापेक्षा अधिकाऱ्यांना पैशांची बंडल मोठी वाटत आहेत का?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
पक्षापलीकडे जाऊन एकवटणार 'वाडा'
ही लढाई आता कोणत्याही एका पक्षाची किंवा गटाची राहिलेली नसून, संपूर्ण वाडा तालुक्याच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. सर्व मतभेद बाजूला सारून 'मायबाप' जनतेने आपल्या येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🚩 बैठकीचा तपशील:
• दिनांक: शनिवार, १४ मार्च २०२६
• वेळ: सायंकाळी ठीक ४:०० वाजता
• स्थळ: ह. वी. पाटील विद्यालय सभागृह, चिंचघर, ता. वाडा.
"आज जर आपण घरात बसलो, तर उद्या आपल्या लेकरांना श्वास घेणंही कठीण होईल. त्यामुळे आपल्या मातीसाठी आणि आपल्या रक्तासाठी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा," असे आवाहन संघर्ष समिती आणि वाडावासीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
घोषणा:
🔥 विषारी टायर कंपन्या वाड्यातून हद्दपार झाल्याच पाहिजेत!
🔥 भ्रष्ट प्रशासनाचा जाहीर धिक्कार!
🔥 एकजूट हीच आपली ताकद!

32
8993 views

Comment