logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

इंदुरीकर महाराजांच्या इशाऱ्यावरून पत्रकाराला दमदाटी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार; कारवाईची मागणी

सातारा (म्हसवड ), (प्रतिनिधी) – कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. माण तालुक्यातील आंधळी येथे आयोजित शासकीय कार्यक्रमाचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला इंदुरीकर महाराजांच्या इशाऱ्यावरून दमदाटी व धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेचा तीव्र निषेध करत माण तालुक्यातील पत्रकारांनी सोमवारी (दि. ९) दहिवडी पोलीस ठाण्यात इंदुरीकर महाराजांविरोधात तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आंधळी येथे रविवारी (दि. ८) इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हा शासकीय कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव लिंगराज साखरे हे कार्यक्रमाचे लाइव्ह कव्हरेज करत होते.

तक्रारीनुसार, कीर्तन सुरू असताना इंदुरीकर महाराजांनी व्यासपीठावरून साखरे यांना पाहिले आणि आपल्या जवळील एका व्यक्तीला खुणावून चित्रीकरण थांबवण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने साखरे यांच्याकडे धाव घेत त्यांचा कॅमेरा ढकलला आणि उद्धट भाषेत दमदाटी केली, असा आरोप करण्यात आला आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे हल्ला झाल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी माण तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी एकत्र येत दहिवडी पोलीस ठाणे गाठले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपक तंडेबडवे, लालासाहेब दडस, सचिन मंगरुळे, धनंजय कावडे, राजेश इनामदार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना निवेदन देत इंदुरीकर महाराज आणि संबंधित कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अभियानातून वगळण्याची मागणी

या प्रकरणात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासारख्या महत्त्वाच्या शासकीय उपक्रमातून इंदुरीकर महाराजांना तत्काळ वगळावे, त्यांच्या जागी संविधानाचा आदर करणारी व समाजाचे खरे प्रबोधन करणारी व्यक्ती नियुक्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

0
12 views

Comment