logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला; पुढील ३ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा ; कोकण-विदर्भात उष्णतेची लाट; अनेक शहरांत तापमान ४० अंशांच्या पुढे

महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानाने रौद्र रूप धारण केले असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण राज्यात, विशेषतः कोकण आणि विदर्भ भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव आणि कोल्हापूरसह राज्यातील बहुतांश शहरांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला असून विदर्भात तापमान ३९ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हवेतील आर्द्रता जास्त असल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा आणि असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना उष्माघातापासून बचावासाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. दुपारी १ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात जाणे टाळावे. बाहेर जाताना डोक्यावर सुती कापड, टोपी किंवा गॉगलचा वापर करावा. सैल, फिकट रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत.
तसेच शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. आहारात नारळपाणी, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत, पन्हे आणि बडीशेपेच्या सरबताचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. काकडी, टरबूज, खरबूज आणि कच्चा कांदा खाल्ल्यानेही उष्णतेचा त्रास कमी होतो.
कडक उन्हातून आल्यावर लगेच एसीमध्ये बसणे किंवा फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे टाळावे. शरीराला बाहेरील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे.
हवामानातील बदल आणि वाढती आर्द्रता यामुळे पुढील काही दिवस उकाडा असह्य होण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

7
623 views

Comment