logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिद्द, कष्ट आणि स्वाभिमानाला सलाम : आंतरराष्ट्रीय महिला दिनी १७ महिलांचा ‘श्यामची आई’ सन्मान


जिद्द, कष्ट आणि स्वाभिमानाला सलाम : आंतरराष्ट्रीय महिला दिनी १७ महिलांचा ‘श्यामची आई’ सन्मान

अमळनेर प्रतिनिधी) –
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील दुर्बल, वंचित, निराधार, एकल, विधवा व परित्यक्ता महिलांच्या जिद्दीला आणि स्वाभिमानाला सलाम करत अमळनेर येथे १७ महिलांचा “श्यामची आई सन्मान” पुरस्काराने गौरव करण्यात आला. समाजातील प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आपल्या कष्ट, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या महिलांचा हा सन्मान सोहळा प्रेरणादायी ठरला.
दि. ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी पारस गोल्ड सराफी पेढी, अमळनेर, साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर व उज्वल फाउंडेशन, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ओम नगर, पिंपळे रोड, अमळनेर येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील उपेक्षित, गरजू व मेहनती महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना सन्मानाची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पल्लवीताई पाटील यांनी सुमधुर आवाजात सूत्रसंचालन करत उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यादेवी (ओम शांती केंद्र संचालक, अमळनेर) या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून योगिता कापडणेकर (नगरसेविका), अपूर्वा चौधरी (नगरसेविका), सुनीता नरेंद्र पाटील, सीमा रगडे (पंचायत समिती), सुरेखाताई सचिन पाटील, कुसुमताई पाटील, सुदर्शनाताई दिलीप पाटील, गौरीताई विनोद थोरात तसेच मा. केंद्रप्रमुख गोकुळ पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र (भाऊसाहेब) पाटील यांनी मराठी व अहिराणी भाषेत केले. समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटकांना प्रेरणा, प्रोत्साहन व आधार देण्यासाठी तीनही संस्था सातत्याने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. “समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजहिताचे कार्य करत राहणे हीच खरी सेवा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात मोलमजुरी, लघुउद्योग, व्यवसाय आणि कष्टाच्या जोरावर कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या १७ महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि ‘श्यामची आई’ पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
सन्मानित महिलांमध्ये सीमा प्रवीण पाटील (पुरणपोळी व्यवसाय), प्रतिभा मिलिंद भावसार (पापड उद्योग), कामिनी पवार (योगशिक्षिका), ज्योती प्रभाकर पाटील (कटलरी व्यवसाय), प्रतिभा सोलंकी (आशा वर्कर), भाविका मनोज कोराणी (ट्युशन क्लास), संगीता रामभाऊ पाटील (पिठाची गिरणी), ईश्वरी जगदीश पंजवाणी (चहा व्यवसाय), इंदुबाई पुंडलिक पारधी (मुलगी पीएसआय), कविता नितीन पाटील (अंगणवाडी सेविका), अनिता अनिल परदेशी (लॉन्ड्री व्यवसाय), संध्या योगेश मोरे (पाणीपुरी व्यवसाय), रोहिणी कैलास कढरे (धुणीभांडी काम), कल्पनाबाई भगवान कंखरे (मुलगा-मुलगी एमपीएससी), आशा दिलीप निकम (भाजीपाला व्यवसाय), लताबाई प्रकाश ओतारी आणि स्वातीताई चौधरी यांचा समावेश होता.
प्रमुख पाहुणे गोकुळ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गरजूंना सन्मान देणारा असा आगळावेगळा कार्यक्रम पाहून आनंद वाटतो. भूक असताना खाणे ही प्रकृती, भूक नसताना खाणे ही विकृती आणि भुकेल्याला अन्न देणे ही आपली संस्कृती आहे. उपेक्षितांचा सन्मान म्हणजे देवाचाच सन्मान आहे.” त्यांनी महिलांना प्रेरणा देताना “नारी शक्ती जागेगी, सब समस्या भागेगी” असा संदेश दिला.
नगरसेविका योगिता कापडणेकर यांनी महिलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर सीमा रगडे यांनी महिलांना शिक्षण, संस्कार व मार्गदर्शन दिल्यास त्या समाजात उत्कृष्ट कार्य करू शकतात, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विद्यादेवी (ओम शांती केंद्र) यांनी जीवनात अध्यात्माचे महत्त्व सांगत चांगले विचार, चांगले आचार व चांगले संस्कार यामुळे जीवन समृद्ध होते, असे सांगितले. कर्माचा सिद्धांत सांगताना त्यांनी काही प्रेरणादायी कथा मांडल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उज्वल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप भालेराव पाटील यांनी उपस्थित मान्यवर, सत्कारार्थी महिला व सर्व नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप धाकड, सचिन मोरे व तीनही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.
हा प्रेरणादायी सन्मान सोहळा महिलांच्या जिद्दीला सलाम करणारा ठरला.


21
1610 views

Comment