जनता विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
शिक्षण, स्वावलंबन आणि स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश
पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा) महाराष्ट्र : जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे दिनांक ९ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरकणी महिला बचत गटाच्या प्रभाग संघ अध्यक्षा सविताताई तरमळे या होत्या, तर प्रमुख वक्त्या म्हणून मीनल अवचार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात माँ जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. विद्यालयातील मुलींनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला संध्या जोशी (ग्रामसंघ कोषाध्यक्ष), किरण तरमळे (ग्रामसखी) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मिरा कोरडे, अनिता आरबुने, निर्मला खुर्दे, वंदना लकडे, वैशाली मांजाटे, मनिषा खंडारे, वनिता खंडारे, वैष्णवी गवते, श्रीमती शीला कुटे, श्रीमती अनिता इंगळे, सुनिता उबाळे, श्रीमती वंदना गावकवाड यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे, ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटोळे, कलाशिक्षक रवींद्र खानंदे तसेच सहाय्यक शिक्षक विवेक गवते यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख वक्त्या मीनल अवचार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “महिलांनी स्वतःच्या शिक्षणासोबतच मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, कारण शिक्षित माता म्हणजे शिक्षित समाज होय.”
ग्रामसखी किरण तरमळे म्हणाल्या, “बचत गटाच्या माध्यमातून आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहोत. प्रत्येक महिलेने या संकल्पनेचा स्वीकार करून पुढे यायला हवे.”
विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी सांगितले की, “स्त्रीच्या प्रगतीशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आजची महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवत आहे.”
प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमात महिलांनी दाखवलेला उत्साह प्रेरणादायी आहे. गावातील प्रत्येक महिला सक्षम झाली तरच खरा विकास शक्य आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सविताताई तरमळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या काळात महिलांना आर्थिक स्वावलंबन अत्यंत आवश्यक आहे. बचत गट, छोटे उद्योग आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी पुढे यावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी इंगळे यांनी केले, तर निर्मला खुर्दे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.