जामखेडमध्ये पैलवान सागर मोहळकरवर फायरिंग; स्थानिक गुन्हे शाखेकडून एक आरोपी ताब्यात, गावठी कट्टा जप्त...
जामखेड (प्रतिनिधी):
जामखेड शहरात पैलवान सागर किसन मोहळकर यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक आरोपी ताब्यात घेतला आहे. आरोपीकडून फायरिंगसाठी वापरण्यात आलेला गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर रोड ते खाडेनगर जाणाऱ्या मार्गावरील नुराणी कॉलनी परिसरात अज्ञात आरोपी मोटारसायकलवरून येऊन पैलवान सागर किसन मोहळकर यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेप्रकरणी किसन चांगदेव मोहळकर (रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक १२२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१) तसेच आर्म्स अॅक्ट ३/२५ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांची स्थापना करण्यात आली. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि हरीश भोये, पोउपनि महादेव गुट्टे तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान अभिमन्यु महादेव पोते (वय २४, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड) हा आरोपी जिक्री गावच्या शिवारात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या (पूर्ण नाव अज्ञात) या साथीदारांसह सागर मोहळकर यांच्या हालचालींची माहिती देऊन फायरिंग केल्याची कबुली दिली.
ताब्यातील आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, सुमारे ४० हजार रुपये किमतीची विना नंबरची ज्युपिटर मोटारसायकल तसेच १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील इतर तीन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ताब्यातील आरोपीला पुढील तपासासाठी जामखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.