गॅस सिलेंडर दरवाढीमुळे महिलांमध्ये संताप........
सरकारकडून ‘लाडक्या बहिणींना भेट
अमरावती, प्रतिनिधी :
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ‘लाडक्या बहिणींना भेट’ अशी घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील महिलांवर आर्थिक ताण वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.
ताज्या दरवाढीनुसार घरगुती गॅस सिलेंडर तब्बल ६० रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडर ११५ रुपयांनी महाग झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या मेळघाटातील गरीब व आदिवासी कुटुंबांच्या स्वयंपाकघराचा खर्च वाढला आहे.
मेळघाटातील अनेक महिलांनी सांगितले की, रोजच्या जीवनात इंधनाचा खर्च भागवणे कठीण होत चालले आहे. काही ठिकाणी महिलांना पुन्हा लाकूडफाटा किंवा चुलीचा वापर करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली असून सरकारने ग्रामीण व आदिवासी भागातील कुटुंबांना गॅसवर अनुदान किंवा सवलत देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना दिलासा देण्याऐवजी दरवाढ झाल्याने मेळघाटातील महिलांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.