जनता विद्यालयात भारतीय डाक विभागाच्या वतीने पत्रलेखन स्पर्धा संपन्न
पिंपळगाव सराई : डिजिटल युगात मानवी संबंधांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने भारतीय डाक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पत्रलेखन स्पर्धा जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा विषय “डिजिटल जगात मानवी संबंध महत्त्वाचे आहेत” असा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, विचार आणि अनुभव यांची प्रभावी मांडणी करत पत्रलेखनाच्या माध्यमातून मानवी नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
स्पर्धेपूर्वी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सतीश निकम (सहाय्यक अधीक्षक, भारतीय डाक विभाग, बुलढाणा) आणि अंकुश कमळसकर (उप डाकपाल, चैतन्यवाडी, बुलढाणा) यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सतीश निकम म्हणाले की, “मोबाईलच्या काळात हरवत चाललेला ‘अक्षरांचा ओलावा’ पुन्हा जिवंत करण्यासाठी पत्रलेखन हे सर्वोत्तम माध्यम आहे.”
अंकुश कमळसकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पत्रलेखन ही केवळ एक स्पर्धा नसून, आपल्या मनातील विचार शब्दांत मांडण्याची आणि कल्पनाशक्तीला वाव देणारी एक उत्तम कला आहे.”
विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पत्रलेखनाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कल्पनांना मुक्तपणे व्यक्त करू शकता आणि ते तुमच्या लेखन कौशल्याला नवी दिशा देते.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी केले, तर गजानन पाटोळे (ज्येष्ठ शिक्षक) यांनी आभार प्रदर्शन केले. या स्पर्धेचे विद्यालयस्तरीय नियोजन रवींद्र खांनंदे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. विद्यालयात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.