*_महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ : शेतकरी, ग्रामीण विकासासोबत
गडचिरोलीसाठी नवे औद्योगिक पर्व माजी खासदार डॉ. अशोकजी नेते
रिपोर्टर : रिसीक
*_महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ : शेतकरी, ग्रामीण विकासासोबत गडचिरोलीसाठी नवे औद्योगिक पर्व – माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची प्रतिक्रिया_*
दि.०६ मार्च २०२६
रिपोर्टर : रिसीक काटिंगल
महाराष्ट्र राज्याचा २०२६ चा अर्थसंकल्प हा शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा असल्याचे मत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत घेतलेले निर्णय ग्रामीण भागातील विकासाला नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पामध्ये पीक कर्जमाफीसाठी जाहीर करण्यात आलेली “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना”, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर लाभ, तसेच शेतमजुरांचा विविध योजनांमध्ये करण्यात आलेला समावेश हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल असल्याचे डॉ. नेते यांनी नमूद केले.
तसेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर, ‘अॅग्रीस्टॅक’सारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून शेती अधिक सक्षम आणि उत्पादनक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान, महिला गोपालक व शेळीपालकांसाठी विशेष योजना यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले “नवे स्टील हब” हे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचेही डॉ. नेते यांनी स्पष्ट केले. विशाल व अतिविशाल स्टील उद्योगांच्या माध्यमातून सुमारे २ लाख ६२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ७० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. यामुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात उद्योग, पायाभूत सुविधा आणि रोजगार यांचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी विशेष कार्यक्रम, महामार्गांचे जाळे विकसित करणे आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ५ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प या उपक्रमांमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान येत्या ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व माताभगिनींना शुभेच्छा देत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेली “लाडकी बहीण” योजना पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत असून राज्यातील लाखो महिलांना याचा मोठा लाभ होत असल्याचे डॉ. नेते यांनी नमूद केले.
एकूणच हा अर्थसंकल्प शेतकरी, शेतमजूर, आदिवासी समाज, महिला आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीचा मार्ग अधिक मजबूत करणारा असून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केला.
याबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, शेतकरी, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि औद्योगिक प्रगतीला प्राधान्य देणारा असा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव, महिला आणि ग्रामीण समाजाच्या आशा-अपेक्षांना नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.