*संत तुकाराम : विद्रोही कवी, समतावादी क्रांतिकारक*
*संत तुकाराम : विद्रोही कवी, समतावादी क्रांतिकारक*
*इंद्रायणीच्या पाण्यात बुडवलेल्या अभंगांची ज्योत पथप्रकाश बनून आजही तेवत आहे.*
काल तुकाराम बीज होती. महाराष्ट्रात हा दिवस संत तुकाराम महाराजांनी “सदेह वैकुंठगमन” केले म्हणून साजरा केला जातो. परंतु इतिहासाच्या चिकित्सक नजरेतून पाहिले तर ही घटना केवळ भक्तिभावाच्या कथानकात अडकून राहत नाही. अनेक अभ्यासकांच्या मते तुकोबांच्या मृत्यूभोवती संशयाची दाट सावली आहे. कारण त्या काळात त्यांनी ज्या व्यवस्थेला आव्हान दिले होते ती व्यवस्था अत्यंत शक्तिशाली आणि असहिष्णु होती.
पण तुकोबांचे खरे महत्त्व त्यांच्या मृत्यूच्या कथेत नाही. त्यांचे महत्त्व त्यांच्या विचारांत, त्यांच्या काव्यात आणि त्यांच्या सामाजिक विद्रोहात आहे. तुकाराम हे फक्त भक्त कवी नव्हते. ते समता, विवेक आणि मानवी प्रतिष्ठेचे निर्भय कवी होते.
*भारतातील सांस्कृतिक संघर्ष : विषमता विरुद्ध समता*
भारतीय संस्कृतीचा इतिहास पाहिला तर तो केवळ धर्मग्रंथांचा किंवा राजवंशांचा इतिहास नाही. तो मूलत: दोन विचारप्रवाहांचा संघर्ष आहे. एक प्रवाह असा आहे जो वेदप्रामाण्य मानतो. यज्ञकर्म, कर्मकांड, जातिभेद यांना मान्यता देतो. समाजाला वर्णांच्या चौकटीत बंदिस्त ठेवतो. तर दुसरा प्रवाह असा आहे जो वेदप्रामाण्य नाकारतो, जातिभेद नाकारतो, कर्मकांडांना आव्हान देतो आणि माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा आग्रह धरतो. या समतावादी प्रवाहात अनेक महान परंपरा येतात. बुद्धांचा बौद्धधर्म, महावीरांचा जैनधर्म, चार्वाकांचे लोकायत तत्त्वज्ञान, चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ, बसवण्णांचे लिंगायत आंदोलन, गुरु नानकाचा शीख धर्म
आणि मध्ययुगातील संत परंपरा ही समतावादी प्रवाहाची गौरवशाली परंपरा आहे.
या परंपरेत ज्ञानदेव, नामदेव, कबीर, रविदास, चोखामेळा, जनाई, मुक्ताई, कान्होपात्रा, गोरोबा, एकनाथ, सेवालाल आणि तुकाराम हे सर्व समतेच्या लढ्यातील सांस्कृतिक योद्धे येतात.
*तुकोबा : भक्त नव्हे तर विद्रोही कवी*
जनमानसात तुकारामांची प्रतिमा अनेकदा “भोळा तुक्या” अशी रंगवली जाते. संसाराची अक्कल नसलेला, विठ्ठलाच्या भक्तीत हरवलेला संत असे चित्र रेखाटलेले दिसते.
परंतु वास्तव अगदी उलट आहे.
तुकाराम हे डोळस विचारवंत होते,
विवेकवादी होते, मानवतावादी होते, समतेचे निर्भय प्रवक्ते होते.
त्यांचा सावकारीचा पिढीजात व्यवसाय होता. परंतु त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. कौटुंबिक वाटणीत आपल्या वाट्याला आलेली कर्जाची कागदपत्रे त्यांनी इंद्रायणीत बुडवली. ही केवळ भावनिक कृती नव्हती. ही शोषणावर आधारित अर्थव्यवस्थेचा नैतिक नकार देणारी कृती होती.
कार्ल मार्क्सचा साम्यवाद जन्माला येण्याच्या शेकडो वर्षांपूर्वी तुकोबांनी व्याजावर जगणाऱ्या व्यवस्थेला नकार देण्याचा सामाजिक आणि आर्थिक समतेचा संदेश दिला होता.
*तुकोबांची साधूत्वाची व्याख्या*
तुकारामांनी साधूत्वाची व्याख्या अत्यंत साध्या पण क्रांतिकारी शब्दांत केली.
“जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा.”
इथे देव मंदिरात नाही, मूर्तीत नाही, स्वर्गात नाही. तो आहे दु:खी माणसांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या माणसात. रंजल्या-गांजल्याना आपलं म्हणणारी ही विचाराची धार पुढे आधुनिक काळात पुरोगामी, समतावादी विचारांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरली.
*भेदभावाविरुद्ध तुकोबांचा आवाज*
तुकारामांनी स्पष्ट सांगितले;
“भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद
आम्हां नको वाद त्यांशी देऊ.”
आणखी एका अभंगात ते म्हणतात
“विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ.”
या ओळींतून तुकोबा सांगतात की संपूर्ण विश्वात एकच चेतना आहे.
जात, वर्ण, उच्च-नीच हे सर्व मानवनिर्मित भ्रम आहेत.
*मूर्तिपूजेवर आणि कर्मकांडांवर प्रहार*
तुकारामांनी निर्भयपणे सांगितले,
“तीर्थी धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनी.”
म्हणजे देव पाषाणात नाही.
देव आहे सज्जन माणसांत.
पंचांग, मुहूर्त, कर्मकांड यांवरही त्यांनी कठोर टीका केली.
पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी, पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥
मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज, दक्षिणेची लाज। बाळगेना ॥
विवेकाने वागा। होऊनी निर्भय,अशुभाचे भय। निर्बुद्धीना ॥
सत्य सांगा लोका। जरी कडू लागे,चाला, नाही मागे। आला कोण"
हरीच्या भक्ताला सगळ्या वेळा व दिशा शुभ आहेत असे सांगताना ते म्हणतात,
"अवघा तो शकून, हृदयी देवाचे चरण
तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ अवघ्या दिशा II"
इथे तुकोबा स्पष्ट सांगतात की
मानवी कष्ट, प्रयत्न आणि विवेक यांना महत्त्व द्या.
"सेंदरी हे देवी दैवते, कोण ती पूजी भुतेकेते
आपुल्या पोटा जी रडते, मागती शिते अवदान" या अभंगातून तुकोबानी पोटासाठी रडणारी दैवते झिडकारली आहेत.
"मोक्षपदा हाणो लाता" असे म्हणत तुकोबानी मोक्षाच्या खुळ्या कल्पनेवर प्रहार केला आहे.
"कोरोनिया भूमी करिती मधी वास, तरी उंदरास काय वाणी I
तुका म्हणे ऐसे कासया करावे? देहासी दंडावे वाउगेची II"
या अभंगातून गुहेत वगैरे जाऊन कठोर तपश्चर्या करण्याची आणि आत्मक्लेश करण्याची गरज नाही असे तुकोबा सांगतात.
"तुका म्हणे न लगे जावे वनांतरा,
विश्व विश्वभरासारखेची"
यात वनात जाण्याची गरज नाही हे विषद करतात. तर "नको सांडू अन्न, नको सेवू वन चिंती नारायण सर्वच भोगी II" यातून उपवासाची गरज नाही हेही सांगतात.
मेल्यावर पिंडदान करण्याच्या लबाडीवर तुकोबा म्हणतात,
"भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान."
अशाप्रकारे तुकोबानी मध्ययुगात कर्मकांडावर प्रहार करीत विवेकवाद रुजवला.
*ढोंगी साधूंवर तुकोबांचा प्रहार*
तुकारामांनी ढोंगीपणावर कठोर शब्दांत प्रहार केला,
“ऐसे संत जाले कली
तोंडी तमाखुची नळी
स्नानसंध्या बुडविली
पुढे भांग ओढविली
भांगभुर्का हे साधन
पचणी पडे मद्यपान
तुका म्हणे अवघे सोंग
तेथे कैचा पांडुरंग. "
आणखी एका अभंगात ते सांगतात;
"अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ,
त्याचे गळा माळ असो नसो I
आत्मा अनुभवी चोखळील्या वाटा, त्याचे माथा जटा असो नसो II
परस्त्री ठायी जो का नपुसक,
त्याचे अंगा राख असो नसो II
परद्रव्या अंध नींदेसी जो मुका,
तोचि संत देखा तुका म्हणे II"
म्हणजे बाह्य वेश नव्हे, तर विचार आणि आचरण हेच संतत्वाचे खरे माप आहे.
*जातिव्यवस्थेवर तुकोबांचा हल्ला*
तुकाराम म्हणतात,
“सकळासी येथे आहे अधिकार
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ
बाळे नारिनर आदी करोनी वैश्याही"
वैश्येसही समान अधिकार सांगणारे हे वाक्य मध्ययुगीन भारतात अत्यंत क्रांतिकारी होते.
आणखी एका अभंगात ते स्वतःबद्दल म्हणतात,
“शूद्रवंशी जन्मलो म्हणोनी दंभे मोकलिलो,
घोकाया अक्षर मज नाही अधिकार
सर्वभावे दीन तुका म्हणे यातिहीन II"
"बरा देवा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो”
उच्च वर्णात जन्म घेतला असता तर दंभाने मेलो असतो, म्हणून कुणबी जन्म घेतल्याबद्दल तुकोबा देवाचे आभार मानतात. ही दीनता नव्हे. ही क्रांतिकारी दीनता आहे. हीच दीनता नंतर शाहू महाराज, आंबेडकर, फुले यांच्या विचारात पुढे गेली.
जात अभिमानाचे कारण नसते.
ती समाजाने लादलेली ओळख असते, हा स्पष्ट संदेश यातून मिळतो.
"महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे
तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही" या अभंगातून तुकोबा अस्पृश्यतेवर आघात करतात.
*जशास तसे वागण्याची शिकवण देणारे तुकोबा भोळे-भाबडे कसे?*
"मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।I
मायाबापाहुनी बहू मायावंत,
करू घातपात शत्रूहुनी II
अमृत ते काय गोड आम्हापुढे,
विष ते बापुडे कडू किती II
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड I
ज्याचें पुरे कोड त्याचेपरि II"
दुर्जनाची नखे खुशाल काढावीत हे सांगताना तुकोबा म्हणतात ;
"दुर्जनाचा मन सुखे करावा खंडण
लात हानोनिया वारी गुंड वाट शुद्ध करी
तुका म्हणे नखे काढुनी टाकीजेती सुखे"
अशाप्रकारे जशास तसे वागण्याची, दुर्जणांचा संहार करण्याची भाषा करणारे तुकोबा भोळे-भाबडे म्हणून रंगवले गेले.
"जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी" असं सांगणाऱ्या तुकोबाला संसाराला लक्ष नसलेला देववेडा दाखवले गेले.
*शब्दांची क्रांती*
तुकारामांसाठी शब्द हे केवळ काव्य नव्हते.
ते म्हणतात,
"आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने,
शब्दाचीच शस्त्रे यत्न करू I
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन,
शब्दें वाटू धन जनलोका II
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव,
शब्देची गौरव पूजा करू II"
शब्द हे त्यांच्यासाठी विचारांचे शस्त्र होते. शब्दच देव, शब्दच जीवन आणि शब्दच गौरवरूपी पूजेस पात्र होते.
*संघर्ष आणि छळ*
तुकारामांच्या आयुष्यात संघर्ष कमी नव्हता. सनातनी धर्ममार्तंडांनी त्यांना त्रास दिला. त्यांची गाथा इंद्रायणीत बुडवली.
या संघर्षाची छाया त्यांच्या अभंगात दिसते,
“रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग
अंतर्बाह्य जग आणि मन.”
"तुझे भिडे माझे बहू जाले घात,
केलो या अंकित दुर्जनाचा I
केला चौघाचार नेलो पांचामधी,
नाही दिली शुद्धी धरू आशा II
भले लोकी यास सांगितली मात,
केला माझा घात दुर्बलाचा II
तुका म्हणे याचा संग नव्हे भला,
शोधित विठ्ठला जाऊ आता II
सनातनी धर्ममार्तंडान्नी वेदाचा अर्थ प्रकट होणारे अभंग रचले म्हणून तुकोबाला न्यायालयात खेचले. त्यावर तुकोबा व्यथित झालेले दिसतात.
*सत्य आणि निर्भयता*
“सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी
देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे”
“सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता”
आणि सर्वांत धीट अभंग म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुकनायक’चे ब्रीदवाक्य केले तो अभंग,
“काय करू आता धरूनिया भीड।
नि:शक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण।
सार्थक लाजून नव्हे हीत ।।”
भीड सोडा. संकोच सोडा. सत्य बोला. लाजून गप्प राहू नका. हीच तुकोबांची आजची सर्वांत मोठी शिकवण आहे.
*पाईकांचे अभंग*
शिवाजी महाराजांच्या सैनिकांसाठी
तुकोबांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसाठी रचलेले ‘पाईकीचे अभंग’ आजही शौर्य आणि स्वराज्यप्रेमाची ज्योत पेटवतात. जीवावर उदार होऊन अन्यायाविरुद्ध लढा, स्वामीभक्ती ठेवा, निर्भय राहा ही शिकवण आजही प्रासंगिक आहे.
*इतिहासातील पुनरावृत्ती*
भारतातील विषमतावादी व्यवस्थेने अनेकांना छळले. एकलव्याचा अंगठा घेतला. तुकारामांची गाथा बुडवली. ज्ञानेश्वरांचा छळ केला. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र नाकारले.
आणि आधुनिक काळातही हीच प्रवृत्ती दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करते.
*तुकोबांची आजची प्रस्तुतता*
आज भारतात भांडवलशाही, जातिव्यवस्था आणि पुरुषसत्ताकता यांची सांगड अधिक मजबूत झाली आहे.
या व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी तुकोबांनी आधीच विचारांची आयुधे तयार करून ठेवली आहेत.
त्यांनी सांगितले;
“असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे.”
*तुकोबांना खरी आदरांजली*
तुकारामांना अभिषेक, पालख्या आणि उत्सवांची गरज नाही.
त्यांना खरी आदरांजली म्हणजे विवेकाचा जागर, समतेचा संघर्ष,
अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि माणसाला माणूस म्हणून पाहणे.
कारण तुकोबा सांगून गेले आहेत;
“सत्य असत्याशी मन केले ग्वाही
मानियले नाही बहुमता.”
बहुमतापेक्षा सत्य मोठे असते
आणि कदाचित म्हणूनच तुकोबा आजही जिवंत आहेत. लोकांच्या स्मृतीत, संघर्षात आणि समतेच्या वाटेवर त्यांची इंद्रायणीत बुडवली गेलेली विचारांची ज्योत आजदेखील पथप्रकाश बनून तेवत आहे.
© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015