logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*गडचिरोलीतील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा

*गडचिरोलीतील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा – महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी*


गडचिरोली – जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील बालरोग विभागात डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे *११ महिन्यांची बालिका वंशिका साजन लेनगुरे (रा.दिभना)* हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच *महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली* यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली तसेच संबंधित डॉक्टरांना जाब विचारत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचार सुरू असताना सदर बालिका सुमारे दोन तासांपूर्वीपर्यंत बरी व स्थिर स्थितीत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन तासांपूर्वीपर्यंत बरी असलेली बालिका अचानक कशी काय दगावली, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात जर अशा प्रकारे निष्काळजीपणा होत असेल आणि निरपराध बालकांचे जीव जात असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.

गडचिरोली हा आदिवासी व दुर्गम जिल्हा असून येथील गरीब नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयांवर अवलंबून असतात. मात्र डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय साधनसामग्री, तसेच काही ठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निष्काळजी वृत्ती यामुळे रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळत नाहीत. यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर घटनेत दोन तासांपूर्वीपर्यंत बालिका बरी असल्याचे सांगण्यात येत असताना अचानक तिचा मृत्यू कसा झाला, याची सखोल चौकशी करून खरे कारण जनतेसमोर आणावे. तसेच या प्रकरणात जर कोणत्याही डॉक्टर किंवा संबंधित अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा आढळून आला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.
तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तात्काळ आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या जागा त्वरित भराव्यात, तसेच रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळतील यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.

जर अशा प्रकारच्या घटना पुढेही घडत राहिल्या आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर याविरोधात तीव्र निषेध नोंदवून मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे. गरीब जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड,नंदुजी कुमरे,धनराज जेंगठे, अण्णाजी जेंगठे, विलास जेंगठे, साजन लेनगुरे, हिवराज गुरनुले, दामोदर उईके, विलास गावतुरे, छगन लेनगुरे, सोमेंद्र गावतुरे, शेषराव मेश्राम, देविदास जेंगठे, गणेश गेडाम, सुरेश जेंगठे, सुभाष गुरनुले सह उपस्थित होते.

0
0 views

Comment