शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द जनगणना कामामुळे शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत मुख्यालय सोडण्यास मनाई..
जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून आदेश लागू...
कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यात आगामी जनगणना 2027 च्या पूर्वतयारीचे बिगुल वाजले असून याचे पडसाद आता शैक्षणिक क्षेत्रात उमटू लागले आहेत. जनगणना कामाच्या नियोजनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गदा आली आहे. घरयादी आणि घरगणनेच्या कामासाठी शिक्षकांना मुख्यालय न सोडण्याचे कडक आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. काय आहे प्रशासनाचा आदेश? जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जनगणना 2027 अंतर्गत घरयादी व घरगणनेचे महत्त्वाचे काम 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे. या प्रत्यक्ष कामापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही आयोजित केले जाणार आहे. महत्त्वाचे मुद्दे मुख्यालय सोडण्यास बंदी. उन्हाळी सुट्टी असली तरी जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. कोणाला लागू? जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना हे आदेश बंधनकारक असतील. प्रशासकीय कारवाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा विनापरवाना मुख्यालय सोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष बारा अंक बत्तीस मधील तरतुदींनुसार हे आदेश काढण्यात आले आहेत. जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असल्याने या काळात सर्व मनुष्यबळ उपलब्ध रहावे यासाठी प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे गावी जाणाऱ्या किंवा सहलींचे नियोजन करणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. जनगणना प्रक्रियेतील घरयादी आणि गणनेचे काम विहित वेळेत पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मे 16 पासून सुरू होणाऱ्या या कामासाठी सर्व शिक्षकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे