वीज जोडणीअभावी धामणी परिसरातील शेतकरी अडचणीत; संतप्त ग्रामस्थांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
लोणी प्रतिनिधी : तेजस वाळुंज
धामणी (ता. आंबेगाव) तालुक्याच्या पूर्व भागातील सात ते आठ गावे गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्यापासून वंचित आहेत. या भागात पावसावर अवलंबून शेती असल्यामुळे दरवर्षी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून धामणी व पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वतःच्या खर्चातून जवळपास तीन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन टाकून पाणी आणण्याची योजना राबवली. या योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन, घरे तसेच सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून ग्रामीण बँका, सहकारी संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतले.
सुमारे सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च करून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली तसेच पाणी उचलण्यासाठी वीज पंपाची व्यवस्था करण्यात आली. मात्र शासनाकडून अद्याप वीज जोडणी न मिळाल्यामुळे ही संपूर्ण योजना रखडलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या मोठ्या भांडवली खर्चातून एक रुपयाचाही फायदा झालेला नाही.
दरम्यान घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा भार वाढत चालल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. काही शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी आपली जनावरे विकण्याची वेळ आली असून अनेकांच्या घरात आर्थिक ताण निर्माण झाला आहे. पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेती पडीत ठेवण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
याचबरोबर काही दिवसांमध्ये वाडी-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते. शेतीचे नुकसान, वाढते कर्ज आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर धामणी व पहाडदरा गावातील ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले. शासनाने तात्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा येत्या काळात तालुक्याचे तहसीलदार, विभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचाही निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
या उपोषणात माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखले, माजी सरपंच अंकुश भूमकर, माजी सरपंच सागर जाधव, विद्यमान सरपंच अक्षय राजे विठ्ठल, माजी सरपंच रेश्मा बोहाडे, भाजप नेते करंदे, पहाडदरा गावचे सरपंच मच्छिंद्र वाघ, महेश वाघ, सोपान वायकर, प्रतीक जाधव, वामन जाधव, दीपक जाधव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.