विकासाच्या नकाशावरचं 'हसनाळ' गाव प्रशासकीय अंधारात!
लेंडी प्रकल्पासाठी त्याग करूनही नशिबी वनवास; रस्ता, लाईट आणि पाण्यासाठी हसनाळकरांची टाहो!
मुखेड (प्रतिनिधी):
"आधी पुनर्वसन, मग धरण" या सरकारी घोषणेचा लेंडी आंतरराज्यीय सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत पूर्णपणे फज्जा उडाला आहे. मुखेड तालुक्यातील हसनाळ हे गाव प्रकल्पबाधित असूनही, प्रशासनाच्या कमालीच्या उदासीनतेमुळे आजही मूलभूत सोयीसुविधांसाठी आसुसलेले आहे. सोन्यासारख्या जमिनी आणि पिढ्यानपिढ्यांची घरे धरणासाठी अर्पण करणाऱ्या हसनाळकरांच्या नशिबी आज रस्ता, लाईट आणि पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
कागदावरचा विकास, जमिनीवरचा विनाश
लेंडी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी हसनाळच्या पुनर्वसन स्थळाची अवस्था पाहिली तर संताप व्यक्त होत आहे. नवीन गावठाणात ना धड रस्ते आहेत, ना पिण्याच्या पाण्याची सोय. पावसाळ्यात या वस्त्यांमध्ये चिखलाचे साम्राज्य निर्माण होते, ज्यामुळे वृद्धांना आणि रुग्णांना दवाखान्यात नेणेही अशक्य झाले आहे.
महत्त्वाचे प्रश्न आणि भीषण वास्तव:
१. अंधारातले गावठाण: नवीन पुनर्वसन स्थळावर वीज पुरवठ्याचे खांब तर उभे आहेत, पण पथदिवे आणि नियमित वीज पुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळी साप-विंचवांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
२. पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट: धरणात पाणी साठवण्याच्या गप्पा मारणारे प्रशासन हसनाळच्या महिलांना पिण्याचे शुद्ध पाणी देऊ शकलेले नाही. व नवीन ठिकाणी पाण्याचा पत्ता नाही.
३. रस्त्यांची दुरवस्था: कमीत कमी 4 किमी मुख्य रोड , रस्त्यापासून हसनाळ पमु गावठाणाकडे येणारे रस्ते केवळ नावापुरते उरले आहेत. खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातच प्रशासनाच्या आशिर्वादाने धरणातुन मातीचा लिलाव मोठ्या प्रमाणात चालू आहे.
४. प्रशासनाची कमालीची उदासीनता: अनेकदा निवेदने देऊन, मुखेड तहसीलवर मोर्चे काढूनही प्रशासनाकडून केवळ 'आश्वासनांची गाजरे' दाखवली जात आहेत. अधिकारी केवळ एसी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
"आमचा गुन्हा काय?" – ग्रामस्थांचा संतप्त सवाल
"आम्ही आमची सुपीक काळी आई (जमीन) आणि राहती घरं देशाच्या विकासासाठी दिली. मग बदल्यात आम्हाला किमान पाणी आणि रस्ताही मिळू नये का? प्रशासनाला आमच्या जिवापेक्षा धरणाच्या भिंती महत्त्वाच्या आहेत का?" असा संतप्त सवाल हसनाळचे प्रकल्पग्रस्त नागरिक करत आहेत.
आता या प्रकल्पग्रस्तांच्या आक्रोशाकडे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासन लक्ष देणार की हसनाळ पुन्हा एकदा अंधारातच व सोई सुविधा मुक्त खड्डेमय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.